पालकांनो शाळेतील पाल्याची शाळेत येता- जाता काळजी घ्या…

क्राईम महाराष्ट्र

शिरुर (अरुणकुमार मोटे): शाळा भरण्याच्या वेळेत पायी जाणाऱ्या मुलींच्या अवतीभोवती मोटार सायकल वरून येवुन जाणून-बुजून काहीतरी कारण काढून थांबणे, त्यांच्या पाठीमागून पुढे जावुन थांबणे, मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहणे असा धक्कादायक प्रकार टाकळी हाजी येथे घडला असून यापुढे पालकांना मुलांची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काळजी घ्यावी लागणार आहे.

15 दिवसांपासून असाच मुलींचा पाठलाग करण्याचा प्रकार या भागात सुरू होता. याबाबत मुलींनी घरी पालकांना कल्पना दिली होती. काही मुलींच्या पालकांनी हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितल्याने याचा शोध घेतला असता सदर व्यक्ती मंगळवारी (दि. १४) सकाळी विद्यालयाच्या समोर आढळून आली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता ती व्यक्ती 25 वर्षीय तरुण असून त्या व्यक्तीवर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची कबुली त्या व्यक्तीने दिली आहे.

त्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील रांधे येथील रहिवासी असून या व्यक्तीचे लग्न झाले असून पत्नी आणि त्याच्यामध्ये वादविवाद होत असल्याने पत्नी माहेरी असते. हा तरुण रांजणगाव एम आय डी सी मध्ये एका कंपनीत हंगामी कामगार म्हणून काम करत असून तो नैराश्येपोटी दारू पिणे, सिगारेट ओढणे असे प्रकार करून जाणूनबुजून मुलींचा पाठलाग करणे, रस्त्याने जाणाऱ्या महिलांकडे पाहणे असा विचित्र प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

वडील निवृत्त शिक्षक आणि आई सुद्धा कॉलेज मध्ये ग्रंथपाल म्हणून काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी समज देवून यापुढे असे प्रकार घडू नये, अशी तंबी दिली होती. परंतु त्या व्यक्तीने बुधवारी सकाळी पुन्हा टाकळी हाजी येथे येत एका दुकानदाराजवळ पोलिसांबद्दल अर्वाच्य भाषा वापरून एका प्रतिष्ठित ग्रुपच्या अध्यक्षाने त्यांच्याकडे पाहिले आहे आता त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे पाहायचे आहे असा धमकीवजा इशारा बोलून दाखविला आहे.

या प्रकारामुळे पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे प्रकार घडल्यास यापुढे सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही प्रकरणात पुढे येण्यास धजावणार नाहीत. पोलीसांच्या निर्भया पथकाने या प्रकणात लक्ष घालून हे प्रकार थांबण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात येत आहे.