शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने ती फसवी कर्जमाफी असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली आहे.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सरकार सांगत असलेल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या खूपच कमी राहणार असून ही योजना शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे.

राज्यात यंदाचा उन्हाळा तीव्र ठरला असून मान्सूनलाही विलंब झाला आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी आणि राज्यासमोरील विविध प्रश्नांवर सर्वसमावेशक चर्चा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, देशासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज होणारी INDIA Alliance ची बैठक महत्त्वाची असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील वाढता असंतोष, पेपरफुटीच्या घटना, परीक्षा व निकाल प्रक्रियेतील गोंधळ, वाढती महागाई तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमती यांसारख्या विषयांवर बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील तरुण न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी इंडिया आघाडी एकजुटीने पुढे जाईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत