शिरुर (तेजस फडके): इनामगाव येथे पुर्वीच्या कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चार जणांना लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवार दि १० जुलै २०२६ रोजी सकाळी 9:15 च्या सुमारास इनामगाव येथील श्रीकांत ट्रॅक्टर्स गॅरेजसमोर घडली. याबाबत रामदास पाटीलबुआ मचाले (वय ४९,रा. इनामगाव, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा प्रतीक मचाले हा वाहनातून शेताकडे जात असताना काही व्यक्तींनी त्याचे वाहन अडविले. त्यावेळी रमेश वाळुंज यांनी प्रतीक याच्याशी पुर्वीच्या वादाबाबत चर्चा करुन पैशांच्या माध्यमातून विषय मिटविण्याबाबत सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याच कारणावरुन वाद वाढला आणि रमेश वाळुंज यांनी प्रतीकची गचांडी पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच इंद्रजित वाळुंज यांनी हातातील लाकडी दांडक्याने प्रतीकला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सुरु असताना रामदास मचाले, त्यांची पत्नी मीनाक्षी मचाले आणि दादा पाटीलबुआ मचाले हे भांडण सोडविण्यासाठी घटनास्थळी आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीत फिर्यादी रामदास मचाले, मीनाक्षी रामदास मचाले, दादा पाटीलबुआ मचाले आणि प्रतीक रामदास मचाले असे चौघे जखमी झाले आहेत. आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रमेश सोनबा वाळुंज, इंद्रजित संपतराव वाळुंज, मयूर रमेश वाळुंज, चंद्रकांत संपत वाळुंज, शहाजी सोनबा वाळुंज आणि प्रसाद शहाजी वाळुंज सर्व (रा. इनामगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार गवळी हे करत आहेत.