पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका
नागपूर: पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीशी झालेल्या गैरवर्तनाचा निषेध करत वडेट्टीवार यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून अशा घटना घडणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे केवळ नवीन कायदे करून काहीही बदल होणार नाही, तर दोषींवर कठोर कारवाई आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सोनम वांगचुक यांना २७ दिवस उपोषण करावे लागणे हे सरकारच्या अपयशाचे लक्षण असल्याची टीका करत, लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी खासगी कंपनीमार्फत विकसित करण्यात आलेल्या नव्या पोर्टलवर नागरिकांकडून शुल्क आकारण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला. कायद्यात स्पष्ट तरतूद नसताना सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकून खासगी कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, या निर्णयाला काँग्रेसकडून तीव्र विरोध केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.