मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने युवक व विद्यार्थी संघटनांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी सुशील बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
याशिवाय, युवक संघटनेत प्रथमच शहरी आणि ग्रामीण अशा दोन स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष पदांची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार विशाल शंकर वाकडकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शहर) प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी युवती संघटनेतही अशाच प्रकारे विभागणी करून मनाली भिलारे यांची शहर प्रदेशाध्यक्षा, तर अमृता कालदाते यांची ग्रामीण प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
या नियुक्तीप्रसंगी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, कार्याध्यक्ष आशिष पवार, माजी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शिक्षक सेलचे राज्य प्रमुख राम राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान मुंबईत पोलीस व्हॅनसमोर निर्भयपणे उभे राहिल्याने चर्चेत आलेल्या रिया अहीर हिने शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी रियाला खंबीर पाठिंबा देत तिच्या सुरक्षिततेबाबत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली.