डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेलच. आज बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे डोकेदुखी होणे अगदी सामान्य झाले आहे.
डोकेदुखीची कारणे
वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची सवय, चहा-कॉफी अधिक पिणे, स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्ही समोर सतत बसणे, अपूर्ण झोप, मानसिक ताणतणाव, अतीप्रवास, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे), डोक्याला मार लागणे, सिगारेट, तंबाखू, मद्यपानाचे व्यसन, वातावरणात होणारे बदल, हवेचे प्रदूषण, हार्मोन्स मधील असंतुलन अशा अनेक कारणामुळे डोकेदुखी होते.
डोकेदुखीचे प्रकार
अर्धशिशी किंवा मायग्रेन डोकेदुखी.
विविध आजारांमुळे होणारी डोकेदुखी.
तणावामुळे होणारी डोकेदुखी.
सायनस डोकेदुखी.
क्लस्टर डोकेदुखी.
थंडरक्लॅप डोकेदुखी.
घरगुती उपाय
डोकेदुखी मध्ये आल्याचा तुकडा चावून खाल्याने आराम मिळतो.
काही लवंगा तव्यावर गरम करून रुमालात घालून त्यांचा वास हुंगल्यास डोकेदुखी कमी होते.
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोकेदुखी होऊ शकते. अशा वेळी पुरेसे पाणी पिल्यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते.
कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते.
वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही डोकेदुखी मध्ये आराम पडतो.
हाताचा अंगठा आणि तर्जनी मध्ये असणाऱ्या जागेत हलकासा दाब देऊन मसाज करावा. ह्या अॅक्युप्रेशर उपायामुळेही डोकेदुखी लगेच कमी होईल.
डॉक्टरांकडे कधी जावे
डोकेदुखीचा त्रास होणे हे सामान्य असले तरीही अनेकदा डोकेदुखी हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. पक्षाघाताचा झटका येणे, ब्रेन ट्युमर, मेंदूची सूज यामध्ये डोकेदुखी होऊ शकते. मेंदूत रक्तस्त्राव किंवा रक्ताची गुठळी झाल्यास डोकेदुखी अतिशय वाढत असते. त्यामुळे अचानक डोकेदुखी वाढणे, डोळ्यांनी वस्तू डबल दिसणे, तोंड वाकडे होणे, बोलण्यास त्रास होणे, फिट्स येणे यासारखी डोकेदुखी बरोबर येणारी लक्षणे धोकादायक ठरू शकतात. यासारखी गंभीर लक्षणे जाणवतात, तेव्हा हॉस्पिटल मध्ये रुग्णाला दाखल करणे आवश्यक आहे. यावेळी न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर तपासणी आणि त्यावर योग्य उपचार करतील. निदान करण्यासाठी डॉक्टर मेंदूची CT Scan, MRI Scan तपासणी करून घेतील.
(सोशल मीडियावरून साभार)