चयापचय बिघडण्याची कारणे

आरोग्य

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते, जे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते आणि लठ्ठपणा नि मधुमेह होण्याचा धोका वाढवते. चयापचय ही शरीरातील एक गुंतागुंतीची जैवरासायनिक प्रक्रिया आहे, ज्यात खाल्लेल्या अन्नाचे नि पेयाचे ऊर्जेत रूपांतर होते. पण, जीवनशैलीतील विविध घटक आणि सवयी या नाजूक संतुलनात अडथळे निर्माण करतात, ज्यामुळे चयापचय प्रक्रिया बिघडते

1) सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे व्हिटॅमिन-डी ची कमतरता

मानवी शरीर व्हिटॅमिन-डी तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. व्हिटॅमिन-डी हे चयापचय कार्यात एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास शरीरात व्हिटॅमिन-डी ची कमतरता होते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास शरीराचे सर्कॅडियन लय म्हणजेच जैविक चक्र मध्ये (झोपण्याची उठण्याची वेळ) यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, जे मेलाटोनिन आणि सेरोटोनिन सारख्या चयापचय नियमन हार्मोन्सवर परिणाम करते.

२) झोप पूर्ण न होणे

चयापचय उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते, कारण ते लेप्टिन आणि घेरलीन सारखे हार्मोन्सचे नियंत्रण करते. झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते, जे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते आणि लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याचा धोका वाढवते.

३) भरपूर प्रमाणत जंक फूड खाणे

प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थात भरपूर साखर, आरोग्यासाठी धोकादायक फॅट्स आणि कृत्रिम पदार्थ असतात जे चयापचय प्रक्रिया बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. अशा पदार्था मधील कॅलरीचे पोषण मूल्य कमी असते. अशा पोषक मूल्य कमी असलेल्या कॅलरीजच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि कालांतराने इन्सुलिन रेझिस्टन्स आणि चयापचय कार्य बिघडू शकते.

४) रात्रीच्या वेळी फोन वापरणे

सतत फोन आणि लॅपटॉप वापरण्याच्या सवयीमुळे आपण नेहमी ब्ल्यू लाईटच्या संपर्कात येतो, जे शरीराच्या नैसर्गिक जैविक चक्रामध्ये अडथळा निर्माण करते. या अडथळ्यामुळे झोपेवर आणि चयापचय प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढणे आणि चयापचयाचे विकार होऊ शकतात.

५) ताण-तणाव 

दीर्घकालीन ताण-तणावामुळे शरीरातील प्राथमिक स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोलच्या उत्सर्जनास चालना मिळते. उच्च कॉर्टिसोल पातळीमुळे भूक वाढू शकते, उच्च-कॅलरी पदार्थांची लालसा आणि अतिरिक्त फॅट्स साचणे या सर्व गोष्टी चयापचय संतुलनात व्यत्यय आणतात.

आपल्या चयापचयाशी संबंधित इतर सामान्य चुकांबाबत सांगताना पालघर येथील लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन, अधिकारी, डॉ. दीपक पाताडे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ ला माहिती देताना सांगितले की, क्रॅश डाएट किंवा दररोज सामान्य किंवा सवयी पेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करणे, जेवण न करणे, विशेषत: नाश्ता, कॅफीन, एनर्जी ड्रिंक्सवर अत्याधिक अवलंबून राहणे आणि शरीरातील पाण्याच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडू शकते आणि एकूण ऊर्जा पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा येतो. रोजच्या जीवनशैलीतील या अडचणी टाळून आणि पोषण, व्यायाम, झोप आणि तणाव व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा संतुलित दृष्टीकोन स्वीकारल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते आणि त्याची चयापचय प्रक्रिया अधिक चांगली होते.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत