पारोळा : शिवरे दीगर येथे १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, ज्ञानेश्वर अशोक पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांत सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवरे दीगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा १७ ऑगस्ट रोजी सकाळी सुरू होती. यावेळी श्याम प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, राहुल वाल्मीक पाटील, गोरख सयाजी पाटील, ज्ञानेश्वर बापू पाटील आणि भूषण सरदार हे ग्रामसभेदरम्यान उभे राहून गोंधळ घालत असल्याचा आरोप आहे.
मुतारीच्या कामाच्या मुद्द्यावरून संबंधितांनी ग्रामसेवक पी. एन. पाटील यांच्यावर आरोप केले. ग्रामसेवकांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांना घेरून खुर्चीवर बसवले आणि छातीवर बुक्का मारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची काळजी न घेता गोंधळ सुरूच ठेवण्यात आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.
ग्राम महसूल अधिकारी संघटना आक्रमक
ग्रामसभेतील गोंधळामुळे ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्राम महसूल अधिकारी संघटनेने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर ज्ञानेश्वर अशोक पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजूजी निकम यांनी पारोळा पंचायत समिती आवारात सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजपूत करणी सेनेकडूनही कठोर कारवाईची मागणी
घटना गंभीर असल्याचे सांगत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेनेही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ग्रामसेवक पी. एन. पाटील हे प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी होते. त्यांची प्रकृती ठीक नसतानाही ग्रामसभेत गोंधळ घातल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय सरपंच परिषदेनेही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी तालुक्यातील सरपंच आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांकडून बंदोबस्त
घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, उपनिरीक्षक विजय भोंबे, उपनिरीक्षक अमोल दुकडे, उपनिरीक्षक राजेंद्र कोठावदे यांच्यासह पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.