पुण्याला २०३२ ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’चे यजमानपद मिळणार? महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र

मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच आवश्यक शासन समर्थन, आर्थिक हमी आणि पायाभूत सुविधांबाबत बांधिलकी देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीची दावेदारी आणखी मजबूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.

पुणे ग्रँड टूर २०२६च्या यशस्वी आयोजनामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. या स्पर्धेची ‘यूसीआय’नेही दखल घेतली असून, आता महाराष्ट्राने जागतिक दर्जाच्या रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी पुढाकार घेतला आहे.

आशियातील पहिले यजमान शहर होण्याची संधी

२०३२ची ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ पुण्यात आयोजित झाल्यास आशियातील पहिले यजमान शहर होण्याचा मान पुण्याला मिळण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्राचे नाव १००हून अधिक देशांतील सुमारे २५ ते ३० कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. त्याचबरोबर सुमारे ३३० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मूल्यनिर्मिती अपेक्षित आहे.

मंत्रिमंडळाने ‘यूसीआय’कडे समर्थनपत्र सादर करण्यास, सुमारे ३६.५ लाख रुपये निविदा शुल्क भरण्यास तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि पुणे ग्रँड टूर समितीला निविदा सादर करण्यासाठी प्राधिकृत करण्यास मंजुरी दिली आहे. यजमानपद मिळाल्यास आवश्यक आर्थिक हमी आणि करारातील अटी पूर्ण करण्यासही तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

व्हिसा सुविधांसह पायाभूत सुविधांवर भर

आंतरराष्ट्रीय सहभाग लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी समन्वय साधत व्हिसा सुलभता प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी रस्ते, सुरक्षा, वाहतूक, निवास, वैद्यकीय सेवा आणि प्रसारण सुविधांसह आवश्यक क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.

याशिवाय स्पर्धेनंतरही राज्यात सायकलिंगला चालना देण्यासाठी ‘वेस्टर्न घाट सायकलिंग कॉरिडॉर’ विकसित करण्याची तसेच पुण्यासाठी ‘यूसीआय सिटी लेबल’ मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

पुणे ग्रँड टूर २०२६च्या यशानंतर आता महाराष्ट्र जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाकडे वाटचाल करत आहे. या स्पर्धेमुळे राज्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि पुण्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील स्थान अधिक भक्कम होईल, असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत