आंबेडकर उद्यानाच्या वाढीव जागेऐवजी उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी; नोवेल साळवेंचे आवाहन

महाराष्ट्र

कल्याण : कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांचे अभिनंदन करतानाच, उद्यानालगतच्या जागेवर उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालय उभारण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालय उभारल्यास नागरिकांना उपचारासाठी मुंबईकडे धाव घेण्याची गरज कमी होईल, असे साळवे यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या उद्यानाच्या जागेबाबत कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, या जागेच्या बाजूची जागा रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा लाभ सर्व जाती-धर्मातील नागरिकांना होईल. मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, अशी भूमिका साळवे यांनी मांडली.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांनी उद्यानापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळतील अशा रुग्णालयाला प्राधान्य दिले असते,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कल्याणमध्ये शासकीय उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालय उभारण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन नोवेल साळवे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत