धाराशिवमध्ये ‘ऑपरेशन टायगर’; भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला शिवसेनेचा शह

राजकीय

धाराशिव : नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धाराशिवमध्ये राजकीय संघर्ष रंगला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या उबाठा गटाच्या नगरसेवकांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ अचानक ‘यू-टर्न’ घेतला. त्यानंतर धाराशिवमार्गे हे नगरसेवक ठाण्यात पोहोचले आणि बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या माध्यमातून उबाठा गटातील नगरसेवकांना भाजपमध्ये घेण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस २.०’ राबवले जात असल्याची चर्चा होती. या नगरसेवकांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती होती. त्यासाठी नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले होते.

मात्र, नगरसेवक इंदापूरजवळ पोहोचताच राजकीय समीकरणे बदलली. त्यांनी मुंबईचा मार्ग सोडून धाराशिवकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना तातडीने ठाण्यात हलवण्यात आल्याची माहिती आहे. अखेर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

या संपूर्ण घडामोडीमागे ओमराजे निंबाळकर यांची गोपनीय रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यापूर्वी कळंब नगर परिषदेत नगरसेवकांना आपल्याकडे खेचत भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे.

या घटनेमुळे धाराशिवमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्षच नगरसेवकांच्या राजकारणावरून आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उर्वरित नगरसेवक कोणत्या पक्षाची वाट धरतात, याकडे आता स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत