मुंबई: शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेणारी भाषणं झाली. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. “स्व. बाळासाहेबांबद्दल मी आणि उद्धव तासन्तास बोलू शकतो. बाहेर कितीही घडामोडी सुरू असल्या तरी त्याचा परिणाम त्यांच्या व्यंगचित्रांवर कधीच व्हायचा नाही. समाधी लागणं काय असतं, हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे,” असं ते म्हणाले. बाळासाहेबांची तुलना त्यांनी तेंडुलकरांच्या पुस्तकातील विचारांशी करत, ते देशातील इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे का होते हे स्पष्ट केल.
राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही तीव्र शब्दांत टीका केली. “आज देशाची राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गुलामांचा जणू बाजार भरलाय. आज बाळासाहेब असते तर हे सगळं पाहून ते फार व्यथित झाले असते. महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू आहेत, हे पाहून शिसारी येते,” असा घणाघात त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “मी पक्षातून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, तर घर सोडणं होतं. त्या घटनेला आता २० वर्षे झाली आहेत. अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्या आहेत. ते सगळं आता सोडून द्या,” असं सांगत त्यांनी ‘आम्ही सोबतच आहोत’ असा स्पष्ट संदेश दिला.
भाषणाच्या शेवटी राज ठाकरे म्हणाले, “एकदा मला ‘बाळासाहेब ठाकरे’ या विषयावर स्वतंत्र व्याख्यान द्यायला आवडेल. त्या माणसाचे सगळे पैलू जगासमोर यायला हवेत. हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते, हे बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. तेव्हा भाजपलाही याची जाणीव नव्हती,” असे म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. या कार्यक्रमामुळे ठाकरे कुटुंबीयांतील एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.