कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध संस्थांच्या पात्र-अपात्रतेच्या मुद्द्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. न्यायालयीन आदेशानंतर अवसायानातील संस्थांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत हालचाली सुरू असतानाच ऐनवेळी संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गोकुळच्या प्रारूप मतदार यादीतील संस्थांच्या पात्रतेवरून दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला हा सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्तीतील काही नेत्यांमध्येही महाडिक गटाबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीतील एका नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती यांनी एकत्र येऊन गोकुळची निवडणूक लढवावी, अशी मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही भूमिका मान्य न करता महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला गोकुळच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांना तूर्तास धक्का बसला आहे.
दरम्यान, वाढीव दूध संस्थांच्या पात्रतेचा मुद्दाही या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. वाढीव १,३२० दूध संस्थांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न झाल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी ६४४ संस्था अवसायानात करण्यात आल्या, तर ४२७ संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली. उर्वरित संस्थांच्या सभासदत्वाबाबतही प्रश्न उपस्थित झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर या संस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रारूप मतदार यादीत संबंधित संस्थांचा समावेश करण्याबाबतही सूचना करण्यात आली. मात्र, न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत राहून आणि संस्थांची सत्यता पडताळूनच मतदानाचा अधिकार देण्याचे निर्देश दिल्याने पुन्हा पात्र-अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच ऐनवेळी अधिकारी बदलल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.
गोकुळच्या राजकारणात मुश्रीफ कुटुंबाचीही महत्त्वाची भूमिका आहे. हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी संघाच्या राजकारणात अधिक लक्ष घातल्याचे मानले जाते. त्यामुळे मुश्रीफ आणि महाडिक गटातील संघर्षाकडे संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.
४ सप्टेंबरला हरकतींचा निकाल
प्रारूप मतदार यादीवरील हरकतींचा निकाल येत्या ४ सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. ही अंतिम यादीच गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणार असल्याने सर्वच गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या असून, अंतिम मतदार यादी कोणाच्या बाजूने झुकते, यावर महायुतीतील पुढील राजकीय समीकरणे ठरण्याची शक्यता आहे.