पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून विरोधकांना सुनावले आहे. “आदरणीय अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी किती मोठी आहे, हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला अधिक माहिती असणार? त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका,” असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवारांच्या अपघातानंतर याप्रकरणी ठोस निर्णय व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यादृष्टीने आम्हीही प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आलो आहोत, हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात शब्द दिला असून तो शब्द पाळण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
“तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. माझा तपास यंत्रणांवर, कायदा आणि संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणावरून सातत्याने माध्यमांमध्ये चर्चा होत असल्याबाबतही सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “सतत मीडियामध्ये येणे म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का, अशी शंका उपस्थित होते,” असे त्या म्हणाल्या.
“दादांची आई, दादांची मुलं आणि मी यांच्यापेक्षा अधिक दु:ख कुणाला होणार आहे, याचा विचार सर्वांनी करायला हवा,” असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना आणि माध्यमांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.