पुतण्या जयसिंग सोळंकेंना देणार संधी!
बीड: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगावच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याऐवजी आपले पुतणे जयसिंग सोळंके यांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा त्यांनी थेट जाहीर व्यासपीठावरून केली. त्यामुळे सोळंके यांनी आपला राजकीय वारसदार निश्चित केल्याची चर्चा माजलगावच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एका विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘येत्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येणार नाही. त्याऐवजी आमच्याकडून माझे पुतणे जयसिंग सोळंके यांना उमेदवारी दिली जाईल,’ असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या विधानामुळे माजलगावच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
जयसिंग सोळंकेंच्या राजकीय प्रवेशाची चर्चा
प्रकाश सोळंके यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने आगामी काळात माजलगावच्या राजकारणात जयसिंग सोळंके यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. सोळंके कुटुंबातील राजकीय नेतृत्वाची धुरा आता पुढच्या पिढीकडे जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, प्रकाश सोळंके यांनी सक्रिय राजकारणातून पूर्ण निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केलेले नाही.
मंत्रीपद न मिळाल्याची नाराजीही व्यक्त केली होती
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी मंत्रिपदाची इच्छा उघडपणे व्यक्त केली होती. आपल्याला जात आडवी येत असल्याने मंत्रिपदाची संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
‘मी ओबीसी समाजात जन्माला आलो असतो, तर मला मंत्रिपदाची संधी मिळाली असती,’ असे विधान त्यांनी केले होते. गेल्या ४५ वर्षांत बीड जिल्ह्यातील एकाही मराठा व्यक्तीला कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळाले नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली होती.
एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना दुसरीकडे प्रकाश सोळंके यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता जयसिंग सोळंके यांना उमेदवारी मिळाल्यानंतर माजलगावच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.