मुंबई: विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की आता, दानवेंनंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी मिळणार. कुणाची नावं चर्चेत आहेत. मविआत आधीच ठरल्याप्रमाणे होणार की भाजप काही खेळी करणार? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
अंबादास दानवेंची कारकीर्द
अंबादास दानवे हे २०१९ साली ऑगस्टमध्ये विधान परिषदेवर निवडून आले. छत्रपती संभाजीनगर, जालना येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर दानवेंनी विजय मिळवला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये अंबादास दानवेंवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षाने दिली होती. पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२५ मध्ये अंबादास दानवेंचा आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.
अशातच या आठवड्यात पावसाळी अधिवेशन संपतंय. त्यामुळे दानवेंचा निरोप समारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी पक्षीय मतभेद विसरून शिंदे, फडणवीसांसह सत्ताधाऱ्यांनीही दानवेंचं तोंडभरून कौतुक केलं. शिवाय, दानवेंच्या निरोप समारंभानिमित्त ठाकरे-शिंदेंमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही रंगलेल्या दिसून आल्या.
दानवेंविषयी सांगायचं झालं तर, ते ठाकरेंचे विश्वासू मानले जातात. ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ठाकरे गटाची बाजू हिरीरीने आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. आता ते विधानपरिषदेत नसतील तर ठाकरेंना आगामी काळात आक्रमक नेत्याची उणीव जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दानवे पुन्हा विधानपरिषदेवर दिसणार
आधी सांगितल्याप्रमाणे अंबादास दानवे छ. संभाजीनगर, जालन्यातली स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आले होते. त्यामुळे अंबादास दानवेंना पुन्हा त्याच विधानपरिषदेच्या जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे गरजेचे आहे. तोपर्यंत अंबादास दानवे यांना वाट पहावी लागणार आहे. दुसरीकडे विधानसभा सदस्यांच्या मतांवर निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ हा २०२६ मध्ये संपणार आहे. मात्र, विधानसभा सदस्यातून निवडून येण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 20 आमदारांचं संख्याबळ आहे. आणि दानवेंना विधानपरिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाची विधानसभा सदस्य संख्या किमान 40 ते 45 हवी होती. त्यामुळे तूर्तास तरी, दानवेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी काही काळ वाट पाहण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
ठाकरेंच्या संधीचं दानवेंनी केलं सोनं
खरंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला एवढं मोठं वलय मिळू शकतं, हे दानवेंनीच दाखवून दिलं. कारण, शिवसेनेत फूट पडल्यानंतर जेव्हा शिंदेंसह भाजपनं दानवेंनाही गळ घातली. तेव्हा मात्र दानवेंनी संधी हेरली आणि त्याचं फळ विरोधी पक्षनेत्याच्या रुपानं त्यांना मिळालं. दुसरीकडे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला विधानसभेचा विरोधी पक्षनेता अजूनही मिळालेला नाही. भास्कर जाधवांचा अर्ज पाठवण्यात आला आहे. पण, त्यावर अजूनही सत्ताधारी पक्षाकडून किंवा विधिमंडळाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागपूरचं अधिवेशन असो वा मुंबईतलं पावसाळी अधिवेशन, दोन्ही अधिवेशनात दानवेंनी आपली बाजू अभ्यासपूर्ण भाषणं करून, आक्रमकपद्धतीनं मांडून आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी संपूर्ण कसब पणाला लावलं.
दानवेंनंतर विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपदी कोण?
विरोधी पक्षनेते पद आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे नाही तर काँग्रेसकडे जाऊ शकतं असं सांगितलं जातंय. कारण, विधान परिषद आणि विधानसभेतलं आमदारांचं संख्याबळ पाहता महाविकासआघाडीनं खालच्या सभागृहात म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला तर वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचं ठरवल्याची माहिती आहे. तरी, आता काँग्रेसकडे हे पद गेल्यास त्यांच्यात एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे सतेज पाटील यांची.
सतेज पाटील उर्फ बंटी पाटील
सतेज पाटील उर्फ बंटी पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं नाव… काँग्रेसच्या निष्ठावंतांपैकी एक. आक्रमक भूमिका संयमितपणे मांडण्याची त्यांची हातोटी आहे. याशिवाय याआधी सत्तेत असताना सतेज पाटलांनी गृह (शहरी), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान आणि संसदीय कामकाज या खात्याचं राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यामुळे दानवेंनंतर आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते सतेज पाटलांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
पण इथेही महत्वाची भूमिका आहे ती बहुमतात असलेल्या सत्ताधाऱ्यांची कारण कनिष्ठ सभागृहात म्हणजे विधानसभेत सरकार स्थापन केल्यानंतरही राज्य सरकारनं भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विधानपरिषदेतही सत्ताधाऱ्यांची निर्णायक भूमिका असणार आहे. त्यामुळे फडणवीसांचं सरकार आणि सत्तेतील तीनही पक्ष सतेज उर्फ बंटी पाटलांच्या विरोधी पक्षनेतेपदाला पाठिंबा देतात की आणखी काही खेळी करतात हे पाहणं महत्वाचं असेल.