७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके यांनी घेतली भेट
शिरूर दि.२९ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी येथील ७५ वर्षीय केरबा बाबूराव खोरे यांच्या पंढरपूर वारीदरम्यान एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलत एकाकी जीवन जगणाऱ्या या वृद्ध शेतकऱ्याची हृदयस्पर्शी व्यथा राज्यभर पोहोचताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उमटला. या घटनेची तातडीने दखल घेत प्रशासनही त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले.
पत्नी व मुलांचे निधन, शेतीवरील हक्क गमावणे आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढणारे केरबा खोरे आजही स्वतःची सर्व कामे स्वतःच करत जीवन जगत आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनकथेने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले.
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तांदळी येथे जाऊन खोरे यांच्या घराची पाहणी केली. आमदार माउली कटके यांनीही भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाकडून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
तहसीलदार म्हस्के यांनी खोरे यांच्या नावावरील १३ गुंठे जमिनीची मोजणी करून त्यांना प्रत्यक्ष ताबा मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, तसेच पीएम-किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. ग्रामपंचायतीमार्फत बंद करण्यात आलेली वीजजोडणी तातडीने पूर्ववत करण्याबाबत महावितरणला सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या सर्व आर्थिक मदतीची रक्कम थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आमदार माउली कटके यांनीही शासन स्तरावर तसेच वैयक्तिक पातळीवर आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सुभाष कळसकर, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, तलाठी दीपक जाधव, गणेश गदादे, काळुराम खोरे, आश्रत गदादे, अजित शेलार, ऋषिकेश खोरे, ऋषी निंबाळकर, दत्तात्रेय नलगे, दत्तात्रेय गदादे, नंदकुमार कुलकर्णी, लक्ष्मण कळसकर, गोरख खोरे, अर्जुन जगताप, पंडित खोरे आदी उपस्थित होते.