शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील मुख्य ड्रेनेज लाईन गेल्या आठ दिवसांपासून खराब झाल्याने अनेक सोसायट्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. रस्त्यांवरुन वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, ठिकठिकाणी निर्माण झालेली डबकी आणि कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, एवढी गंभीर परिस्थिती असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बाबुरावनगर परिसरात अंदाजे १५ ते २० हजार नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक मोठ्या सोसायट्या, निवासी इमारती आणि नागरी वस्ती असलेल्या या परिसरातून शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर कर मिळतात. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या या परिसरातील नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांसाठी वारंवार संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
सांडपाणी थेट रस्त्यावर…
गेल्या आठ दिवसांपासून ड्रेनेज लाईनमध्ये बिघाड झाल्याने अनेक सोसायट्यांच्या परिसरात सांडपाणी साचले आहे. काही ठिकाणी गटारे तुंबून सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून डास आणि माशांचा उपद्रव वाढला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. साचलेल्या सांडपाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, अतिसार आणि त्वचारोग यांसारखे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लाखोंचा खर्च गेला कुठे…?
बाबुरावनगर परिसरातील गटार आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. मात्र, एवढा मोठा खर्च करुन उभारण्यात आलेली गटार योजना वारंवार नादुरुस्त होत असेल, तर या कामाचा दर्जा नेमका काय होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गटार योजनेचे काम कोणत्या ठेकेदारामार्फत करण्यात आले, त्यासाठी किती निधी खर्च झाला, कामाची तांत्रिक तपासणी कोणी केली आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची आहे, याची माहिती ग्रामपंचायतीने नागरिकांसमोर जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
लाखो रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही नागरिकांच्या दारासमोर सांडपाणी साचत असेल, तर हा निधी नागरिकांच्या सुविधांसाठी खर्च झाला की केवळ कागदोपत्री कामे पुर्ण दाखविण्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
रस्त्यांचीही दयनीय अवस्था…
सांडपाण्याच्या समस्येबरोबरच बाबुरावनगरमधील अनेक रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी चिखल आणि सांडपाण्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. याच रस्त्यांचा वापर महिला, लहान मुले आणि विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी करतात.
निसरड्या रस्त्यांवरुन जाताना अनेक नागरिक घसरुन पडल्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुचाकीस्वारांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का…? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
कर भरा; पण सुविधा मागू नका…?
बाबुरावनगर परिसरातून ग्रामपंचायतीला सर्वाधिक कर मिळत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना स्वच्छ रस्ते, सक्षम ड्रेनेज व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, कर वसुलीच्या वेळी तत्परता दाखविणारे प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे मात्र कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून कारभार करणार आणि सर्वसामान्य नागरिकांनी सांडपाणी, दुर्गंधी आणि खड्ड्यांमध्ये जीवन जगायचे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
तातडीने कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा…
या गंभीर समस्येची ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेऊन ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी, रस्त्यावर आलेले सांडपाणी हटवावे, गटारांची स्वच्छता करावी आणि परिसरात औषध फवारणी करावी, अशी मागणी माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांना सोबत घेऊन शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत प्रशासन जागे होऊन बाबुरावनगरच्या नागरिकांना सांडपाण्याच्या विळख्यातून मुक्त करणार की नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत प्रशासन यावर उत्तर देणार का…?
बाबुरावनगरच्या ड्रेनेज योजनेवर नेमका किती खर्च झाला…? वारंवार लाईन खराब होण्याचे कारण काय…? दुरुस्तीची जबाबदारी कोणाची…? नागरिकांच्या तक्रारींवर गेल्या आठ दिवसांत कोणती कारवाई करण्यात आली…? तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन कधी करण्यात येणार…? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण देणार…? तसेच नागरिकांकडून लाखो रुपयांचा कर वसूल करुनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कोणासाठी आणि कशासाठी सुरु आहे, याची आता बाबुरावनगरमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
लवकरच ड्रेनेजलाईन सुरु होईल; राहुल बांदल
याबाबत शिरुर ग्रामीणचे ग्रामविकास अधिकारी राहुल बांदल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन गेलेली आहे. तिथे रस्ता आहे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक चालते. त्यामुळे येथील सांडपाणी वाहून नेणारा सिमेंटचा पाईप फुटल्याने पाणी पुढे जाण्याचे थांबले आणि पाठीमागे सांडपाणी तुंबले. गेल्या दोन ते तीन दिवसापासुन आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी अहोरात्र मेहनत करुन सांडपाण्याची पाईपलाईन दुरुस्तीचे काम करत आहेत. त्यामुळे एक दोन दिवसातच पाईपलाईनचे काम पुर्ण होऊन सांडपाण्याची सोय होईल.