रांजणगाव MIDC पोलीसांनी शेतीपंप चोरी करणा-या तीन चोरांना अटक करत 10 गुन्हे आणले उघडकीस

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. तसेच खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे रांजणगाव पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तीन जणांना अटक केली असुन त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.

रांजणगाव MIDC पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाढलेल्या विद्युत मोटारी आणि रोहीत्र चो-यांमुळे परिसरातील शेतक-यांना हाताशी आलेल्या पिकाला पाणी देणे आवघड झाले होते. या चोरीच्या प्रकरणांची पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल आणि शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी गंभीर दखल घेवुन या चोरांचा छडा लावण्याच्या सूचना रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक ढवाण यांनी स्वतंत्र तपास पथक तयार करुन तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार वैज्जनाय नागरगोजे, संतोष औटी यांना सदरचे गुन्हे उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.

सदर तपास पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणांना भेटी देवून तांत्रीक व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतांना पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपींबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी तपास पथकासह सापळा रचून काही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयांची कबुली दिली आहे.

सदर चोरी प्रकरणी  1) अख्तर अली हबीबउल्ला अली (वय 36), 2) शाह नचुन मोहम्मद (वय 23), 3) रफिक अब्दुल्ला अन्सारी (वय 40) सर्वजण रा. मुळ रा. इटवा, सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे. या आरोपीना गुन्हयाच्या तपासकामी (दि 4) रोजी अटक करण्यात आलेली असुन सदर आरोपीनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव येथील डि. पी. चोरींची तसेच खंडाळे येथील शेतीपंप मोटार चोरींची आणि कारेगाव फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरींची कबुली दिली असुन त्यांच्याकडुन 125 किलो तांब्याच्या तारा, 3 इलेक्ट्रीक शेतीपंप व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन अटक केलेल्या आरोपीनी रांजणगाव पोलीस स्टेशनकडील एकुण 10 गुन्हयांची कबुली दिली असुन रांजणगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

शेतकऱ्यांना शेतीपंप परत देणार…

सदर चोरी प्रकरणाचा पोलीसांनी तातडीने छडा लावुन आरोपीना अटक करुन त्यांचेकडुन शेतीपंप मोटार व तांब्याच्या तार जप्त केल्याने परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच सदरच्या जप्त करण्यात आलेल्या शेतीपण मोटार या शेतक-यांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर संबंधीत शेतक-यांना परत करणार असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगीतले आहे.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, यशवंत शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, सुरज वळेकर पोलिस हवालदार वैज्जनाथ नागरगोजे, संतोष औटी, विलास आंबेकर, पोलिस नाईक माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, माणिक काळुकूटे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचापुढील तपास पोलिस हवालदार वैभव मोरे, संदिप जगदाळे, कल्पेश राखोंडे, अभिमान कोळेकर, गणेश आगलावे, तेजस रासकर सहायक फौजदार सुभाष गारे हे करत आहेत.