केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत. आजकाल आपल्यापैकी बऱ्याचजणांना फारच कमी वयात केसगळती व केस अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या सतावतात. या समस्यांवर उपाय म्हणून आपण अनेकदा इन्स्टंट आणि लगेच झटपट परिणाम दिसून येतील अशाच उपायांवर अधिक भर देतो. परंतु अशा इन्स्टंट उपायांचे परिणाम हे देखील तात्पुरतेच असतात. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी आपण बाजारातून वेगवेगळ्या पद्धतीची महागडी ब्युटी प्रॉडक्ट्स विकत घेतो. पण त्यातील केमिकल्समुळे केसांची मुळं कमजोर होतात, केस गळायला लागतात आणि केसांच्या समस्यां सुटण्याऐवजी आणखीनच वाढतात. पण जर आपल्याला हे सगळं टाळून केसांना रंग द्यायचा असेल आणि त्याचवेळी पोषणही द्यायचं असेल, तर कधीही नैसर्गिक घरगुती उपाय करणेच उत्तम राहील.
कांद्याची टरफलं, जी आपण सहसा फेकून देतो, त्यामध्ये अशी काही नैसर्गिक रंगद्रव्य असतात जी पांढऱ्या केसांना रंग देण्यासाठी आणि केसांच्या वाढीसही मदत करतात. यासोबत इतर घरगुती घटक जसे कलोंजी, मेथी दाणे, अळशीच्या बिया, रोझमेरी, खोबरेल तेल वापरून आपण घरच्याघरीच सुरक्षित नॅचरल हेअर डाय बनवू शकतो.
साहित्य
१) कांद्याची टरफलं – २ ते ३ कप
२) कलोंजी – २ टेबलस्पून
३) मेथी दाणे – २ टेबलस्पून
४) अळशीच्या बिया – २ टेबलस्पून
५) रोझमेरी – १ टेबलस्पून
६) खोबरेल तेल – ३ ते ४ टेबलस्पून
कृती
१) सगळ्यातआधी एका मोठ्या कढईत कांद्याची टरफलं, कलोंजी, मेथी दाणे, अळशीच्या बिया, रोझमेरी असे सगळे जिन्नस एकत्रित घ्यावेत.
२) आता हे सगळे जिन्नस गॅसच्या मंद आचेवर हळूहळू भाजून घ्यावेत.
३) हे सगळे जिन्नस करपवून त्यांच्या रंग जोपर्यंत संपूर्णपणे काळा होत नाही, तोपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावेत.
४) कढईतील सगळ्या पदार्थांचा रंग बदलून काळा झाल्यावर गॅस बंद करून हे सगळे जिन्नस एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावेत. हे सगळे जिन्नस थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावेत.
५) सगळे जिन्नस थंड झाल्यावर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेऊन ते एकत्रित वाटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी.
याचा वापर कसा करावा
या तयार मिश्रणापासून नैसर्गिक व घरगुती पद्धतीने हेअर डाय तयार करण्यासाठी, एका बाऊलमध्ये तयार बारीक पावडर घेऊन त्यात गरजेनुसार खोबरेल तेल मिसळून घ्यावे. खोबरेल तेल घालून, हे मिश्रण पातळ करून घ्यावे. तयार नॅचरल हेअर डाय ब्रशच्या मदतीने केसांवर लावून घ्यावा. अर्धा ते एक तास हे मिश्रण केसांवर असेच लावून ठेवावे. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घायवेत. आठवड्यातून किमान १ ते २ वेळा हा उपाय केल्यास केस काळेभोर, घनदाट, लांबसडक तर होतातच तसेच केसगळती सारख्या केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)