सकाळी झोपेतून उठल्या नंतर लगेच तोंडावर, डोळ्यांवर पाणी मारण्याची अनेकांना सवय असते. उठल्या उठल्या डोळ्यांवर पाणी मारण्याने अत्यंत थंडगार आणि ताजेतवाने वाटते. मात्र, ही एक वाईट सवय आहे. डोळ्यात अश्रूंच्या ग्रंथी असतात, त्यावर तेलाचा एक थर असतो. जेव्हा आपण डोळ्यांवर पाणी मारतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या थरावर होत असतो. परिणामी डोळ्यांना कोरडेपणा येतो.
डोळ्यांमधील अनावश्यक गोष्टी, कचरा बाहेर काढण्यासाठी डोळ्यात नैसर्गिक यंत्रणा असते. डोळ्यात गेलेला कचरा बाहेर काढण्यासाठी, तसेच डोळ्यांना वंगण म्हणून अश्रू काम करतात. इतकेच नव्हे, तर कोणत्याही संसर्गा पासूनही आपल्या डोळ्यांचा बचाव केला जातो. अश्रूत लाइसोझाइम, लैक्टोफेरिन, लिपोकॅलिन, लैक्टोफेरिन, इम्युनोग्लोबुलिन, ग्लुकोज, युरिया, सोडियम, पोटॅशियम या घटकांसह पाण्याचा थर, म्युसिन थर, लिपिड्स असे तीन थर नैसर्गिकरीत्या असतात. अश्रूत अनेक असे घटक असतात; जे आपल्या डोळ्यांचे इतर जीवजंतूंपासून रक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे झोपून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारून आरामदायी आणि ताजेतवाने जरी वाटत असेल, तरीही असे करणे चुकीचे आणि डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. डोळ्यांची नाजूक रचना, कॉर्निया, नेत्रश्लेष्मला यांना आपण ज्या घटकांच्या संपर्कात आणतो, त्यांसाठी आपले डोळे संवेदनशील असतात.
आपण जे पाणी वापरतो ते पाणी अशुध्द असून, त्यामध्ये अनेक जीव जीवाणू असू शकतात; ज्यांमुळे डोळ्यांना धोका होऊ शकतो. नळाच्या पाण्याचा थेट डोळ्यांवर वापर केल्यास अशुध्द पाण्यामुळे डोळ्यांना जळजळ, संसर्ग किंवा इतर त्रासदायक संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात. इतकेच नव्हे, तर ज्या टीयर फिल्म मुळे डोळ्यांच्या पृष्ठभागाची काळजी आणि दृष्टीची स्पष्टता राखण्यास मदत मिळते, त्या टीयर फिल्म मध्ये डोळ्यांवर मारल्या जाणाऱ्या पाण्याच्या हबक्याच्या तीव्रतेमुळे व्यत्यय येऊ शकतो.
डोळ्यांवर भराभर आणि जोरात पाणी मारण्यापेक्षा सौम्य पध्दतीचा वापर करावा. थेट डोळ्यांवर पाणी मारण्या ऐवजी एखाद्या ओल्या स्वच्छ फडक्याने डोळ्या भोवतीचा भाग पुसून घ्यावा. तसेच रात्रभर झोपल्याने डोळ्यांतून पाणी आले असल्यास किंवा इतर स्राव स्वच्छ करून घ्यावा. तसेच जर कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करीत असाल, तर डोळ्यांच्या योग्य त्या स्वच्छता पध्दतीचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे. ज्यांना उठल्यानंतर डोळ्यांसाठी ‘रिफ्रेशिंग’ रुटीन हवे असेल, त्यांनी प्रिझर्व्हेटिव्ह मुक्त कृत्रिम टीअर्स चा वापर करावा. अथवा विशेषतः डोळ्यांच्या स्वच्छतेसाठी तयार केल्या गेलेल्या सौम्य आय वॉश सोल्युशनचा वापर करावा. अशी उत्पादने डोळ्यांना कोणतीही इजा न पोहोचवता ओलावा देण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. शेवटी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे हे डोळ्यांच्या दृष्टीसाठी, तसेच डोळ्यांना कोणत्याही त्रासाचे लवकर निदान करण्यासाठी फायदेशीर ठरते.
(सोशल मीडियावरून साभार)