घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटकही आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी असतात.
मेथी
मेथी, पालेभाजी व मसाल्याचा पदार्थ म्हणून सर्वांच्या वापरात सर्रास आहेच. मेथीची भाजी पथ्थ्यकर भाजी आहे. पाने थंड गुणाची, सारक, पाचक, वातानुलोमक, पित्तनाशक व सूज कमी करणारी आहेत. मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक व गर्भाशय संकोचक आहेत. बिया रक्त व पित्तवर्धक आहेत.
वात व पित्ताच्या रुग्णांसाठी उत्तम
मेथी वात व पित्तप्रकृती रुग्णांकरता उत्तम आहे. मेथी बिया पचनसंस्थांवर विशेष कार्य करतात. मेथी चावून खायला लागल्यापासून लाळास्रााव उत्तम सुरू होतो. आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक मधुमेह या व्याधीकरिता जी एकमेव वनस्पती मानतात, ती म्हणजे मेथी होय. मेथी बियांचा प्रत्येक कण तोंडातील, आमाशय, पच्यमानाशय, स्वादुपिंड या आतड्यातील गोडपणावर, कफावर कार्य दरक्षणी करीत असतो. त्यामुळे नुसत्या मेथ्या चावून खाणे, सकाळी मेथीपूड पाण्याबरोबर घेणे, मेथ्या उकळून त्याचे पाणी पिणे, मेथीकूट खाणे, मेथी पालेभाजी खाणे, मेथी पालेभाजीचा रस पिणे असे अनेक उपाय जगभर मधुमेही माणसे यशस्वीपणे करीत आहेत. सर्वात सोपा उपाय म्हणजे एक चमचा मेथीपूड एक पोळीला लागणाऱ्या कणकेत मिसळून अशा हिशोबात पोळ्या खाणे. यामुळे रक्तातील साखर कमी होते. नियंत्रित राहते. शरीराचा बोजडपणा कमी होतो.
मोहरी
स्वयंपाकात रोज वापरात असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थात मोहरी सर्वात उष्ण आहे, तीक्ष्ण आहे. त्याकरिता सर्व पदार्थांत चव आणण्याकरिता, झटका आणण्याकरिता मोहरी वापरली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान या भागात थंडीच्या मोसमात मोहरीच्या तेलाने मसाज करून घ्यायचा प्रघात आहे. समस्त वातविकारात थंड, कफ प्रकृतीच्या रुग्णांकरिता मोहरीच्या तेलाचे मसाज फार फायदेशीर आहे. ज्यांना हे तेल फार उष्ण वाटते त्यांनी त्यात तीळ तेल, खोबरेल किंवा एरंडेल मिसळावे. मोहरीच्या तेलाच्या मसाजामुळे काहींना पुरळ येते. त्याकरिता काळजी घ्यावी. दुखऱ्या गुडघ्यावर किंवा लहान-मोठ्या सांध्यांवर मोहरीचा वाटून लेप लावावा, बांधून ठेवावे, रात्रीत गुडघ्यातील दुखावा कमी होतो.
अर्धांगवायू, संधिवात, आमवात, सायटिका, खांदा जखडणे, मान गुडघ्याचे विकार या सगळ्या वातविकारांत थंड ऋतूत मोहरी तेल किंवा मोहऱ्या वाटून त्याचा लेप यांचा वापर जरूर करावा. तीळ तेल, एरंडेल तेल, लिंबोणी तेल, करंजेल तेल यांच्या जोडीला मोहरी तेलाच्या मदतीमुळे, अभ्यंगार्थ महानारायण तेल तयार केले जाते. कोणत्याही विषावर उलटी करण्याकरिता मोहरीचे पाणी प्यावे. उलटी होऊन बरे वाटते. छातीत खूप कप झाल्यास मोहरी व मीठ यांचा काढा प्यावा. उलटी करवून कफ निघून गेला की दमेकऱ्यास बरे वाटते. तरुण माणसांवरच हा प्रयोग करावा. जंत व कृमी सहजपणे पडत नसल्यास मोहरीची चिमूटभर पूड तीन दिवस घ्यावी. जंत नाहीसे होतात. पोटदुखी, डोकेदुखी याकरिता मोहरी वाटून त्या त्या अवयवांवर लेप लावावा. लघवी साफ होण्यासाठी ओटीपोटावर लेप लावावा. पोटफुगी, अपचन, अजीर्ण याकरिता मोहरी चूर्ण आल्याच्या रसाबरोबर घ्यावे. मोहरी खूप उष्ण आहे, याचे भान नेहमी ठेवावे.
(सोशल मीडियावरून साभार)