‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील भूमिकेबाबत राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच त्यांच्या काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. “आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित संतोष गाजरे लिखित ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी गंगाधरराव फडणवीस यांच्या जनसंघातील कार्याचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची निष्ठा, जिद्द आणि संघटन कौशल्याचा वारसा पुढे नेल्याचे सांगितले.
बाळासाहेब फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे धीरगंभीर, अभ्यासू आणि प्रभावी वक्ते आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली केली, मात्र जनसंघाच्या विचारसरणीने प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केला. भविष्यात त्यांच्याकडे देशपातळीवरील मोठी जबाबदारी येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, जलयुक्त शिवार, अटल सेतू, सिंचन प्रकल्प आणि पूरनियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये फडणवीस यांच्या दूरदृष्टीचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र बँकेचे संचालक प्रसेनजित फडणवीस, व्याख्याते विशाल गरड, प्रकाशक संतोष धायबर आणि संदीप कद्रे यांची उपस्थिती होती.