वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

महाराष्ट्र

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे.

मंगळवारी वरळी डोम परिसरात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजप महायुतीने मोर्चा काढला होता. ऐन गर्दीच्या वेळी निघालेल्या या मोर्चामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. याचदरम्यान आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेली एक महिला या कोंडीत अडकली होती. संतप्त झालेल्या महिलेने गाडीतून उतरून थेट मंत्री महाजन आणि पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारत, “इथून निघून जा, गाड्यांची लांब रांग लागली आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला. मोर्चा खुल्या मैदानात का घेतला नाही, असा सवालही तिने उपस्थित केला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी वाहतूक कोंडीबद्दल खेद व्यक्त केला. “मी वैयक्तिकरित्या त्या महिलेची माफी मागितली. आम्ही काही मिनिटांत निघणार होतो, मात्र त्या वैतागल्या होत्या. त्यांनी अयोग्य भाषा वापरली आणि रागाच्या भरात बाटली फेकली,” असे त्यांनी सांगितले. तसेच, पोलिसांनी तिच्यावर कठोर कारवाई करू नये, असे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात दुसऱ्या दिवशी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. वकील गणरत्न सदावर्ते यांच्या मुलीनेन झेन सदावर्ते यांनी ही तक्रार दिली असून, शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मोर्चा आयोजकांवरही सार्वजनिक गैरसोय केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित महिलेची ओळख श्रीमती ग्रेवाल अशी पटली आहे. त्या सुमारे एका तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या आणि आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत