पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

परिसर संरक्षण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ आणि श्वेता वेरणेकर यांनी उपसभापतींच्या दालनात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना, राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा आणि वेग व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांबाबत सविस्तर सादरीकरण केले.

या सादरीकरणानंतर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी पुण्यातील प्रत्यक्ष निरीक्षणांचा उल्लेख करत सार्वजनिक वाहतुकीत महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. विशेषतः गर्भवती महिलांना बसमध्ये चढताना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधत, बसच्या पायऱ्या सध्याच्या तुलनेत अधिक खाली ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उंच पायऱ्यांमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या संदर्भात परिवहन मंत्र्यांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती देत, लवकरच बेस्ट तसेच राज्यातील इतर बस परिवहन संस्था आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मे महिन्यात ही बैठक घेण्याचा प्रयत्न असून, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, जनजागृती आणि धोरणात्मक नियोजन अत्यावश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत