छत्रपती संभाजीनगर: गणेश कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीच्या श्वसनमार्गात चुकून स्कार्फ पिन (सेफ्टी पिन) गेल्याने गंभीर प्रसंग ओढावला. मात्र गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल , औरंगाबाद (घाटी) येथील कान-नाक-घसा विभागाने अत्यंत कौशल्याने ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून मुलीचा जीव वाचवला.
नेमके काय घडले?
रविवारी (ता. १) रात्री सुमारे १० वाजता मुलगी ड्रेस व्यवस्थित करत असताना तिने दातात स्कार्फ पिन धरली होती. ती चुकून श्वसनमार्गात गेल्यानंतर तिला तीव्र खोकला आणि छातीत वेदना सुरू झाल्या. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने घाटीत दाखल केले.
डॉक्टरांनी खबरदारी म्हणून रात्री १० पासून तिला काहीही खाणे-पिणे दिले नाही. छातीच्या एक्स-रे तपासणीत डाव्या मुख्य श्वासनलिकेत रेडिओ-अपेक परकीय वस्तू अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. ही अवस्था अत्यंत धोकादायक असल्याने तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी
घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख आणि त्यांच्या पथकाने ब्रॉन्कोस्कोपीद्वारे श्वासनलिकेत अडकलेली ‘तीन इंचांची’ लोखंडी रॉड असलेली पिन अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढली. या शस्त्रक्रियेत वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरिजा जालनापूरकर, डॉ. कल्याणी, डॉ. उत्कर्ष, डॉ. ऋषीकेश, डॉ. ऋतुजा आणि डॉ. तुषार यांनी सहभाग घेतला. अॅनेस्थेसिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गणेश निकम आणि व्याख्याता डॉ. किरण यांनी भुल व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. ऑपरेशन थिएटर नर्सिंग स्टाफ वैभव पानसरे यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
मोठा अनर्थ टळला
ही पिन फुप्फुसात जाऊन बसल्याने गंभीर इजा होण्याची शक्यता होती. मात्र तज्ज्ञांच्या तत्पर उपचारांमुळे मोठा अनर्थ टळला. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून तिचा श्वसन त्रास पूर्णपणे कमी झाला आहे. कुटुंबीयांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
वर्षभरात सहा शस्त्रक्रिया
घाटीत वर्षभरात पिन किंवा दगड गिळण्याच्या सहा घटना समोर आल्या असून गेल्या आठवड्यातच दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.“लहान मुलांकडून अशा घटना वाढत आहेत. पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.