सिमरिया जंगलात एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, दोन मुले अनाथ

महाराष्ट्र

झारखंड: झारखंड राज्याला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला दिल्लीला हलवण्यासाठी निघालेली एअर ॲम्बुलन्स सिमरिता येथील घनदाट जंगलात कोसळली. या भीषण दुर्घटनेत विमानातील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ चतराच नव्हे तर संपूर्ण झारखंड शोकसागरात बुडाले आहे.

स्वतःच्या ढाब्यातील आगीत गंभीर भाजले होते संजय कुमार

लाटेहार डिस्ट्रिक्ट मधील चांदवड येथील ४१ वर्षीय संजय कुमार हे ढाबा व्यवसायिक होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या स्वतःच्या ढाब्यावर लागलेल्या आगीत ते ६५ टक्क्यांहून अधिक भाजले होते. त्यांच्यावर देवकमाल हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना दिल्लीतील उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी मोठ्या आशेने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली; पण हीच आशा त्यांच्या आयुष्याचा अंत ठरली.

उड्डाणानंतर २३ व्या मिनिटाला संपर्क तुटला

‘रेडबर्ड एअरवेज’चे बीचक्राफ्ट C90 हे एअर ॲम्बुलन्स विमान सोमवारी सायंकाळी ७:११ वाजता बिरसा मुंडा एअरपोर्ट वरून दिल्लीसाठी झेपावले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र उड्डाणानंतर बरोबर २३ मिनिटांनी, सायंकाळी ७:३४ वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबतचा संपर्क अचानक तुटला.

यानंतर काही वेळातच सिमरिया जंगल परिसरात विमान कोसळल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर बचाव पथकांना विमानाचा पूर्ण चक्काचूर झालेला आढळला. अपघात इतका भीषण होता की सातही जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

अख्खे कुटुंब उद्ध्वस्त; दोन मुले झाली अनाथ

या दुर्घटनेत रुग्ण संजय कुमार यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतण्या धीरू कुमार यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे संजय यांच्या १७ वर्षीय शुभम आणि १३ वर्षीय शिवम या दोन मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडील दोघेही गमावल्याने ही दोन्ही मुले पूर्णपणे अनाथ झाली आहेत.चंदवा गावात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि ग्रामस्थांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

मृतांमध्ये कोणाचा समावेश?

या भीषण दुर्घटनेत कॅप्टन विवेक विकास भगत (पायलट), कॅप्टन सवराजदीप सिंह (को-पायलट), डॉ. विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा, रुग्ण संजय कुमार, त्यांची पत्नी अर्चना देवी आणि अटेंडंट धीरू कुमार यांचा समावेश आहे.डॉ. गुप्ता हे एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कर्तव्यावर निघाले होते; मात्र नियतीने त्यांच्यावरही घाला घातला.

प्राथमिक अंदाज आणि चौकशीचे आदेश

प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

(DGCA) ने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच तांत्रिक बिघाड, हवामानाची स्थिती आणि उड्डाणाच्या सर्व बाबींची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

या दुर्दैवी घटनेने एअर ॲम्बुलन्स सेवांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले असून संपूर्ण राज्यातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत.