भावनिक रक्षाबंधन; अजितदादांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून राखी अर्पण

महाराष्ट्र

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा भावनिक कार्यक्रम सोमवारी (२५ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैशाली नागवडे यांनी अजितदादांच्या प्रतिमेला राखी अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना रक्षाबंधन करण्यात आले. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, नेते उमेश पाटील, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, राष्ट्रीय युवक अध्यक्ष आकाश झांबरे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे आणि सहकोषाध्यक्ष संजय बोरगे यांनाही महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधली.

वैशाली नागवडे यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवा नेते जय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांना, विधानसभा उपाध्यक्ष आणि सर्व आमदारांना पत्रासोबत राखी पाठवली आहे. महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विश्वासाची साथ द्यावी, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

‘दादा… तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही भगिनी कार्यकर्त्या कायम प्रयत्नशील राहू,’ असा विश्वास वैशाली नागवडे यांनी भावनिक पत्रातून व्यक्त केला. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून अजितदादांना आपल्यातून जाऊन सात महिने पूर्ण होत असल्याने शक्य तितक्या महिलांनी त्यांच्या स्मृतीस्थळी किंवा आपापल्या ठिकाणी अजितदादांच्या प्रतिमेला राखी अर्पण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाला प्रदेश प्रतिनिधी सुनिता शिंदे, सुरेखा पेडणेकर, मुंबई अध्यक्षा आरती साळवी यांच्यासह राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत