डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

महाराष्ट्र

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप

मुंबई: भारतीय जनता पक्षाने आणलेले डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक हे राष्ट्रविरोधी आणि लोकशाहीची थट्टा करणारे असल्याचा जोरदार हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या विधेयकामुळे देशात प्रादेशिक असमतोल निर्माण होऊन अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. केवळ राजकीय स्वार्थासाठी भाजप देशहित आणि लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचा या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध असून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनीही त्याला विरोध करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून त्यानंतर जाती-धर्माच्या आधारावर मतदारसंघांची निर्मिती करायची, जातीय आणि भाषिक दंगली घडवायच्या आणि त्यातून निवडणुका जिंकायच्या, असा भाजपचा कुटील डाव आहे. हे विधेयक देशासह महाराष्ट्राच्याही हिताच्या विरोधात आहे. महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या कमकुवत करून गायपट्ट्याचे वर्चस्व वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

सपकाळ पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास त्या ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतातील गायपट्ट्यातील जागांची वाढ तुलनेने अधिक होणार असल्याने तेथील राजकीय वर्चस्व वाढेल आणि इतर राज्यांचे राजकीय महत्त्व कमी होईल. जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली तरी सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात प्रतिनिधित्व वाढणार नाही, ही चिंतेची बाब आहे.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, सध्याच्या लोकसभा जागांमधूनच महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करावे आणि २०२९ पूर्वी महिला आरक्षणाची अंमलबजावणी करावी. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा राजकीय अजेंडा राबवू नये. काँग्रेसची हीच भूमिका इंडिया आघाडीचीही असून यापूर्वीही आघाडीतील सर्व पक्षांनी अशा विधेयकाला विरोध केला होता.

पैसा फेक तमाशा देख’चा खेळ देशभर सुरू

डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनार्थ देशात जाणीवपूर्वक वातावरणनिर्मिती केली जात असून भाजपकडून विशिष्ट नरेटिव्ह पसरवला जात आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला. हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जात असून दडपशाही, पक्षफोड आणि कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ‘पैसा फेक तमाशा देख’चा खेळ देशभर सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

केवळ आमदार आणि खासदारांची संख्या वाढवून लोकशाही मजबूत होणार नाही. देशाचे खरे मालक १४० कोटी नागरिक आहेत. केवळ पाच हजार आमदार-खासदार देशातील संपूर्ण जनतेचे प्रभावी प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचे अधिकार वाढवून या संस्था अधिक सक्षम केल्या पाहिजेत, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

शरद पवार भाजपच्या कुटील डावात अडकणार नाहीत!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP-SP) डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांवरही सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित राहिला आहे. त्यामुळे ते भाजपच्या कुटील राजकीय डावात अडकणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शरद पवार आणि त्यांचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत, तर विरोधात मतदान करतील, अशी अपेक्षाही सपकाळ यांनी व्यक्त केली. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून इंडिया आघाडीतील मित्रपक्षांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत