मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा खांब कोसळून बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता, मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटी, चिकूवाडी, मार्वे रोड येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही मुले स्वतःच दहीहंडी फोडत होती. हंडीची दोरी झाडाला तसेच तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आली होती. हंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान हा विटांचा खांब अचानक कोसळला. यामध्ये रुद्र कदम (वय ७ वर्षे) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर रुद्रला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयाच्या माहितीनुसार तो ‘Brought Dead’ अवस्थेत आणण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, उत्सवाच्या आयोजनातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लहान मुलांकडून अशा प्रकारे उत्सव साजरा केला जात असताना पालक, स्थानिक मंडळे आणि आयोजकांनी आवश्यक सुरक्षा उपायांची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.