उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंबई बँकेच्या महिलांसाठीच्या योजनेचा आवर्जून उल्लेख

महाराष्ट्र

मुंबई: सन २०२५- २०२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बोलताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर अध्यक्ष असलेल्या “मुंबई बँके”चा व महिला सक्षमीकरणासाठी या बँकेच्या योजनेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच यावेळी अजित पवारांनी सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँकांना आवाहन देखील केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ. योजनेतून दरमहा १५०० रुपयांची थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल शासनाने उचललं आहे. लाडकी बहिण योजनेचे खाते उघडलेल्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंत कर्ज देणार आहे.

राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना जोडून कर्ज योजना काढावी. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू, असे आवाहन देखील त्यांनी केले.