sangli bull

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…

महाराष्ट्र

सांगली: भिलवडीमधील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये चक्क मगर आणि बैलाचा चार तास थरारक पाठलाग पाहायला मिळाला. बैलाच्या मालकाने आणि नावाडी चालकांनी मगरीच्या तावडीत सापडण्याआधीच बैलाची सुटका केली.

भिलवडीमधील अक्षय मोरे यांनी आटपाडीमधील जनावराच्या बाजारामधून 70 हजार रुपये देऊन खिलारी जातीचा बैल खरेदी केला होता. बैलाला टेम्पोमध्ये घेऊन ते गावी निघाले होते. बैलाला टेम्पोमधून उतरवत असताना अचानकपणे टेम्पोचा आणि इतर गाड्यांचा हॉर्न वाजला. त्यामुळे नवीन ठिकाण आणि गाड्यांचा आलेला आवाज यामुळे बैल बिथरला आणि सैराभैरा होऊ लागला. बैलाने गाडीतून थेट उडी मारून पळत सुटला आणि तो थेट कृष्णा नदीच्या तीरावर जाऊन पोहोचला.

बैलाच्या मागे अक्षय आणि त्याचे इतर मित्र देखील पोहोचले. बैलाला नदीमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण बैल थेट पाण्यामध्ये गेला. अक्षय आणि त्याचे मित्र जसे जसे पुढे जाऊ लागले तसा तसा हा बैल पाण्यातून पुढे पुढे सरकू लागला. बैल पाण्यात आल्याचे पाहून मगरीही या बैलाच्या आजूबाजूने धावत आल्या. बैलाच्या दिशेने या मगरींचा पाठलाग सुरू झाला. बैल जसा जसा पुढे जाऊ लागल्या तशा मगरी देखील या बैलाच्या मागे जाऊ लागल्या. बैलाने या मगरींना चकवा देण्याचा प्रयत्न सुरू केला.

मगरी आणि बैल यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. बैल मगरीच्या तोंडी लागणार याची भीती सगळ्यांनाच लागली होती. पण अक्षय आणि त्याच्या इतर नावाडी चालक मित्रांनी नावेतून पाण्यात उतरत बैलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण, नाव पाण्यात उतरल्यावर बैल आणखी पुढे जाऊ लागला. कृष्णा नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीराकडे त्याचा प्रवास सुरू झाला. मगरी काही हटत नव्हत्या. पाण्यामध्ये मग नावाडी बैल आणि मगर असा थरारक खेळ सुरू झाला होता. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुसऱ्या बाजूला पोहोचलेल्या बैलाला अक्षय व नावाडी चालकांनी बाहेर काढले. मगरीच्या तावडीतून या बैलाची सुटका केली. तब्बल चार तास कृष्णेच्या भिलवडीच्या नदीपात्रामध्ये बैल आणि मगरींचा हा पाठ शिवणीचा थरारक खेळ सुरू होता. बैलाची सुखरूप सुटका झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला.