मुंबई: देशाचा असो की राज्याचा अर्थसंकल्प, कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात गृहस्वामिनीचे लक्ष सर्वप्रथम कशाकडे असते? कांदा, बटाटा, भाजीपाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅसच्या किमतीकडे.
आजही प्रत्येक घरात महागाईचा भडका किती वाढणार याचीच चर्चा आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या दरातील चढ-उतारावरही सर्वसामान्यांचे लक्ष आहे.
प्रश्न अनेक आहेत… पण उत्तर एकच दिले जाते – “अफवांवर विश्वास ठेवू नका, सरकार समर्थ आहे.”
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाबाबत कसे बोलायचे, यासाठी केंद्र सरकार नक्कीच सक्षम आहे. पण एवढे सांगून सर्वसामान्यांच्या चिंतेचे प्रश्न संपत नाहीत. घरगुती गॅसच्या दरवाढीचे नेमके कारण काय? दर वाढवणारे कोण? आणि त्यावर नियंत्रण ठेवणारे कोण?
उद्योगांसाठी गॅस पुरवठा तात्पुरता बंद
इराण-इस्रायल संघर्षामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाची झळ आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा आहे. संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी राज्य सरकारने उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या ४७ किलो आणि ४५० किलो क्षमतेच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
घरगुती वापराचा गॅस सुरळीत उपलब्ध राहावा, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर स्वीकारू नयेत, अशा सूचनाही डीलर्सना देण्यात आल्याचे समजते.
पुणे जिल्ह्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांटमधूनही अशाच सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. डीलर्सना व्यावसायिक गॅससाठी गाड्या पाठवू नयेत, तसेच नवीन ऑर्डर घेऊ नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर मुख्यतः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि औद्योगिक क्षेत्रात होतो. धातू वितळवणे, पावडर कोटिंग, उत्पादन प्रक्रिया अशा अनेक कामांसाठी हा गॅस अत्यावश्यक असतो.त्यामुळे पुरवठा थांबल्यास उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध मर्यादित साठाच वितरित केला जाणार असून त्यानंतर नवीन पुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घरगुती गॅसला प्राधान्य
सरकारकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले जाते. आखाती देशांतील तणावामुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर युद्धाचा परिणाम भारतातील ऊर्जा बाजारावर किती काळ जाणवेल, याकडे उद्योग व व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
गॅस दरवाढीचा फटका
दरम्यान, देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत १४.२ किलो घरगुती सिलेंडरचा दर आता ९१२.५० रुपये झाला आहे.तसेच १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ११५ रुपयांची वाढ झाली असून मुंबईत हा दर १८३५ रुपये झाला आहे.यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारचे स्पष्टीकरण
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत होत्या. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण देत देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भारताकडे कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असून पुरवठा साखळी सुरळीत असल्याचेही सांगण्यात आले आहे. रशिया आणि अमेरिकेकडूनही तेल व एलपीजी आयात सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पण मग दरवाढ का?
सरकारचे स्पष्टीकरण मान्य केले, तरी एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो – जर तुटवडा नाही, पुरेसा साठा आहे, तर मग गॅस दरवाढ कोणाच्या निर्णयामुळे झाली?
या दरवाढीवर नियंत्रण ठेवणारे कोण? आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे कोण?
महिलादिन आणि महागाई
आज जागतिक महिलादिन आहे. पण प्रत्येक घरातील गृहस्वामिनीचा महिलादिन हा रोजचाच असतो. घर चालवताना ती महागाईशी रोज झुंज देत असते.
सरकारने या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आवश्यक ते निर्बंध घालावेत, नोटिसा द्याव्यात; पण सर्वसामान्य जनतेला सुखाने जगू द्यावे.महागाईची झळ घरोघरी बसू नये, हीच अपेक्षा.