औरंगाबाद: औरंगाबाद शहरात विदेशी ‘हायड्रो गांजा’ची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखेने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेने एन-४ परिसरातील राजवीर चरणसिंग बिरग (२०) आणि ओम रवींद्र शिंदे (२३) यांना मंगळवारी रात्री छावणीतील लोखंडी पुलावर सापळा रचून रंगेहाथ पकडले. राजवीरच्या बॅगेत गांजाची आठ पाकिटे आणि एक छोटा वजनकाटा आढळून आला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोघांना १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, प्रवीण वाघ व अभिजित चिखलीकर यांच्या पथकाने केली.
सुशिक्षित कुटुंबातील तरुण
अटकेत असलेले दोघेही सुशिक्षित व सधन कुटुंबातील आहेत.राजवीर हा पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे.ओमने पुण्यातील महाविद्यालयातून एमबीए पूर्ण केले असून गेल्या सहा महिन्यांपासून शहरात वास्तव्यास आहे.पुण्यातील वास्तव्यादरम्यान ते नशेच्या आहारी जाऊन स्मगलर्सच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
स्नॅपचॅट-टेलिग्रामवरून व्यवहार
राजवीर आणि ओम यांच्यासह काही मित्रांनी पैसे गोळा करून हायड्रो गांजाची खरेदी केल्याचे तपासात उघड झाले.स्नॅपचॅटवरील ‘जॉली’ नावाच्या प्रोफाइलवरून ऑर्डर देऊन ते ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथील स्मगलर्सकडून गांजा आणत होते.ते ५ ते ६ हजार रुपये प्रतिग्रॅम दराने गांजा खरेदी करून शहरातील उच्चभ्रू वसाहती व मोठ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये प्रतिग्रॅमपर्यंत विकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काय असतो ‘हायड्रो गांजा’?
हायड्रो गांजा हा हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केला जातो. यात वनस्पती मातीऐवजी पोषक द्रव्य मिसळलेल्या पाण्यात वाढवली जाते. बंद जागेत एलईडी किंवा एचआयडी दिव्यांच्या सहाय्याने तापमान, आर्द्रता व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण नियंत्रित करून त्याची लागवड केली जाते.
सामान्य गांजामध्ये टीएचसीचे प्रमाण साधारण ५ ते १५ टक्के असते, तर हायड्रो गांजामध्ये ते ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे त्याची नशा अधिक तीव्र मानली जाते.
आरोग्यावर गंभीर परिणाम
टेट्राहायड्रोकॅनॅबिनॉल (THC)चे प्रमाण जास्त असल्याने हायड्रो गांजाचा परिणाम मेंदूवर वेगाने होतो. अतिसेवनामुळे भ्रम निर्माण होणे, स्मरणशक्ती कमी होणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका देखील संभवतो.
दर दहापट जास्त
साधा गांजा : १ ते ३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम
हायड्रो गांजा : ५ ते १५ हजार रुपये प्रति १० ग्रॅम
पोलिसांच्या माहितीनुसार हायड्रो गांजाची तस्करी प्रामुख्याने विदेशातून केली जाते. तरुणांमध्ये या नशेचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.