इंदुरीकर महाराजांचे परखड वक्तव्य; तरुणांना ‘यूज अँड थ्रो’पासून सावध राहण्याचं आवाहन

महाराष्ट्र

अकोला: अकोल्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत कीर्तन करत समाजातील विविध प्रश्नांवर परखड भाष्य केलं. तरुणाई, शिक्षण व्यवस्था, दंगली, प्रेमप्रकरणं आणि सामाजिक वास्तव यावर त्यांनी थेट शब्दांत मत मांडलं.

तरुणांना उद्देशून बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका. तुमचा वापर फक्त ‘यूज अँड थ्रो’साठी होतोय.” आज प्रत्येक ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक असून, दंगलीत दिसल्यास तब्बल दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

बारावी आणि दहावीच्या परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत, परीक्षा काळात राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. “आजची पोरं अभ्यास करत नाहीत. परीक्षा आली की खिडकीतून चिठ्ठी येते,” अशा शब्दांत त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली.

उपजीविकेच्या प्रश्नावर बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “मी दीड वर्ष शेती करून पाहिली. काहीही खरं नाही. इतर काहीही करा, पण भाजी आणि किराणा वरच्यावर भरता येईल असं काहीतरी करा.”

दंगली आणि गुन्हेगारी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, आजकाल पेनमध्येही कॅमेरे असतात. “टपरी पेटवताना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसलात तर दहा वर्षांची शिक्षा ठरलेली आहे. आतापर्यंत दंगलीत गरीबांचीच पोरं आत गेली आहेत; श्रीमंतांची नाहीत आणि ती कधी जाऊ देणारही नाहीत,” असं ठणकावून त्यांनी सांगितलं.

प्रेमप्रकरणांवर भाष्य करताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं. “मुलगी हुशार आणि चांगल्या मुलावर प्रेम करत नाही. ती दरिद्री आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांच्याच नादी लागते,” असं म्हणत त्यांनी समाजातील वास्तव मांडल्याचं सांगितलं. दरिद्री मुलाबरोबर पळून गेलेली मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही, असा दावा करत, “ती सुखी असल्याचं सांगितलं तर मी तिच्या घरी सहा महिने भांडी घासतो,” असंही ते म्हणाले.

आपल्या वक्तव्यांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, “मी काहीही केलं तरी लोक शिव्या देतात. ३१ वर्ष आयुष्य लोकांच्या शिव्या खाण्यात गेलंय. मग थोड्यासाठी कशाला बंद करायचं?” असे म्हणत यापुढेही कीर्तन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.