औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर

मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देत आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, किफायतशीर आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास या क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक धोरणात्मक आणि अन्य सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या गोरेगाव येथील जागतिक दर्जाच्या मुंबई मुख्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली, आशियाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आणि गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक स्तरावर छाप

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताने जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या कडक नियमन असलेल्या बाजारपेठांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांना मोठी मागणी आहे. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता जागतिक स्तरावर सिद्ध झाली आहे. आता या क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषाला अधिक गती देणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात उभारण्यात येणारा बल्क ड्रग पार्क औषधनिर्मिती क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे औषधनिर्मिती उद्योगात व्यापक बदल घडून येण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कोविड काळातील ॲस्ट्राझेनेकाच्या योगदानाचे स्मरण

कोविड-१९ महामारीच्या काळात ॲस्ट्राझेनेकाने दिलेले योगदान भारत विसरणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोविशिल्ड लसीच्या माध्यमातून नागरिकांना मोठा आधार मिळाल्याचे अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत भारताने ९९ देशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. या उपक्रमातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय संस्कृतीतील भावना प्रत्यक्ष कृतीतून जगासमोर आली. या कार्यात ॲस्ट्राझेनेकाचे योगदान महत्त्वपूर्ण होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी संशोधनाची गरज

आरोग्यसेवेतील परिवर्तनासाठी नवोन्मेष अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, औषधनिर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि निदान पद्धतींमध्ये सातत्याने नवे संशोधन होत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.

अचूक निदान, रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि आधुनिक औषधांचा प्रभावी वापर यांमुळे आरोग्यसेवेचा दर्जा उंचावता येईल. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेष हाच महत्त्वाचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांनी एकत्र यावे

महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे आगमन होत असून, ॲस्ट्राझेनेकाने या विद्यापीठांसह राज्यातील नामांकित संशोधन संस्थांशी सहकार्य वाढवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अशा भागीदारीमुळे संशोधनाला संस्थात्मक बळ मिळेल आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात कार्यरत तरुणांच्या प्रतिभेचा उपयोग देशाच्या विकासासाठी करता येईल.

मुंबईतील मुख्यालयाच्या माध्यमातून कंपनीने संशोधन, औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवेच्या विविध क्षेत्रांत विस्तार करावा. उद्योगांची वाढ ही राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाशी जोडलेली आहे. त्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासन आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाशी कंपनीची बांधिलकी

ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली यांनी प्रास्ताविकात मुंबईतील मुख्यालयामागील भूमिका स्पष्ट केली. भारताच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेशी आणि महाराष्ट्राच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या दृष्टिकोनाशी कंपनीचे उद्दिष्ट सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताला नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्था बनविण्यासाठी औषधनिर्मिती आणि जैवऔषध क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे ॲस्ट्राझेनेकाचे उद्दिष्ट आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये परिवर्तन घडविण्यासोबतच श्वसनविकार, जैवऔषधे आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांमध्येही कंपनी संशोधन करीत आहे. महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे अक्किनेपल्ली यांनी यावेळी सांगितले.

औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढविण्याच्या दिशेने ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबई मुख्यालयाचे उद्घाटन महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राज्य शासनाच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात औषधनिर्मिती आणि जैवऔषध संशोधनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत