घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध घेण्यात यश आले. व्यापारी सूरज वांगडे, पुणे जिल्हा माहिती सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे तसेच दौंड रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांच्या तत्पर समन्वयामुळे ही मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन भाटी हा मुलगा काही कारणावरून घरातील व्यक्तींवर रुसून घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावर पोहोचला आणि तेथून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला.

दरम्यान, मुलगा घरातून निघून गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी करमाळा येथील व्यापारी सूरज वांगडे यांच्याशी संपर्क साधून मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती दिली. तसेच तो मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

ही बाब गांभीर्याने घेत सूरज वांगडे यांनी तात्काळ पुणे जिल्हा माहिती सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला. गव्हाणे यांनी वेळ न दवडता दौंड रेल्वे पोलीस, दौंड रेल्वे स्थानक प्रशासन, माजी नगरसेवक प्रवीण परदेशी, व्यापारी विनय निमुळ कर, पवन जाधव, यश लोढी तसेच संबंधित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून मुलाबाबतची संपूर्ण माहिती दिली.

यानंतर दौंड रेल्वे स्थानकावर मदुराई–मुंबई एक्स्प्रेस आल्यानंतर पोलीस व संबंधित यंत्रणांनी रेल्वेच्या विविध डब्यांमध्ये कसून शोधमोहीम राबवली. अखेर पवन भाटी हा मुलगा रेल्वेत सुखरूप आढळून आला. त्यानंतर त्याची विचारपूस करून त्याच्या कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला.

मुलगा सुरक्षित मिळून आल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. योग्य वेळी केलेला समन्वय, तातडीची कार्यवाही आणि पोलीस यंत्रणेची तत्परता यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या प्रकरणात व्यापारी सूरज वांगडे यांनी दिलेली तातडीची माहिती, लक्ष्मण गव्हाणे यांनी केलेला समन्वय, ए पी आय अजित कोल्हे, एल सी बी पोलीस पांडुरंग थोरात आणि दौंड रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांची तत्पर कारवाई यामुळे अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध घेणे शक्य झाले. नागरिकांनी अशा प्रसंगी विलंब न करता तातडीने पोलीस व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत