औरंगाबाद: दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला आज (मंगळवार) सकाळी 8 वाजता आगीत सापडला. किल्ल्याच्या परिसरातील सुकलेले गवत, झाडं जळून खाक झाले असून जीवसृष्टी आणि इतिहासाच्या वारशाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
ही आग काला कोट भागातून सुरू झाली आणि वाऱ्याच्या झोताने क्षणार्धात बालेकिल्ल्याला वेढून घेतल जुन्या बारादरीवरील लाकडी सज्जे व तुळे यांच्यावर देखील भस्मसात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्राणी धावत सुटले.
सुकलेल्या गवतामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग इतकी पसरली की मोर, माकडं, लांडोर, इतर पक्षी शेतामध्ये पळताना दिसले अनेक लहान प्राणी आणि जीवजंतू होरपळून गेले या दृश्यांनी उपस्थितांची काळीजं हादरली.
स्थानिकांची शर्थीची झुंज
अग्निशामक वाहन पोहोचू शकत नसल्याने, स्थानिकांनी झाडांच्या फांद्या, पाण्याचे हंडे वापरून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
दरवर्षी अशीच आग का
दरवर्षी उन्हाळा आला, की देवगिरी किल्ल्यावर आग लागण्याच्या घटना घडतात. या दुर्लक्षामुळे इतिहासाचा अमूल्य ठेवा धोक्यात आला आहे.
इतिहास अभ्यासक सांगतात की, या वारंवार लागणाऱ्या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचं नुकसान होत आहे.
शासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती आहे.
प्रशासनाने किल्ल्याच्या संरक्षणासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात.