मुंबई: सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली असताना राज्यात, विशेषता कोकणात वाळू माफियांकडून सर्रासपणे बंदी मोडून वाळू उपसा सुरू असल्याची गंभीर मुद्दा भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारच्या निदर्शनास आणून दिला. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्यात आठवड्याभरात वाळू धोरण आणणार असल्याची घोषणा केली.
विधानपरिषदेत सदस्य अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरिल चर्चेत सहभाग घेत दरेकर म्हणाले कि, सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. तरीही रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बंदी मोडून वाळू उपसा केला जात आहे. असाच प्रकार राज्यात सर्वत्र सुरू आहे. संगमेश्वरला तर दिवसरात्र उपसा सुरू आहे. यामध्ये महसूल अधिकारी आणि वाळू माफिया यांचे संगनमत आहे. सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कोणत्या कठोर उपाययोजना करणार आहे, असा सवाल केला.
यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी, वाळू माफिया यांचे रॅकेट सुरू आहे. याकरिता उत्कृष्ट वाळू धोरण आणण्याची गरज आहे. आठवड्याभरात वाळू धोरण आणतोय. जनतेच्याही वाळू धोरणा संबंधी चांगल्या सूचना आल्यात. वाळू धोरण आल्यावर महाराष्ट्रात सुरू असलेल्या गोष्टींना आळा बसेल. रायगड, रत्नागिरीत वाळू उपसाबाबत माहिती घेऊन कारवाई करू.