मुंबई: मुंबईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
सांगली जिल्ह्यातील कुच्ची गावाहून मुंबईतील माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्थान लेव्हर या कंपनीत नोकरी केली होती. आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत लोकप्रिय झाले होते. मात्र पत्रकारितेचे आकर्षण असल्याने त्यांनी ही नोकरी सोडून पत्रकारितेत प्रवेश केला.
‘श्री’ या साप्ताहिकातून पत्रकारितेची सुरुवात केल्यानंतर त्यांनी मुंबई संध्या, सामना, लोकनायक आणि पुण्यनगरी या आघाडीच्या दैनिकांमध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम केले. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील मंत्री, आमदार आणि पक्षप्रमुखांशीही त्यांनी आपल्या स्वभावामुळे वेगळी छाप पाडली होती.
अलीकडच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अंथरुणाला खिळले होते. आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ७ वाजता कुर्ला येथील सोनापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले , खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासह विविध सामाजिक-राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच अनेक दैनिकांचे पत्रकार व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.येत्या रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या स्मरणार्थ जलदान विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.