मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होणार आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांतील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, तर दुष्काळग्रस्त भागांतील शिवसैनिकांनी मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दुष्काळाच्या संकटामुळे यंदा सांस्कृतिक कार्यक्रम टाळून शिवसेना नेत्यांच्या भाषणांनी मेळाव्याची सुरुवात होणार आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात काय भूमिका मांडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, शेतकरी कुटुंबांना या संकटातून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक राज्यातील विविध भागांकडे रवाना करण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे शिवसैनिकांना राज्यव्यापी कार्यक्रमाची दिशा देणार आहेत.
दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि पदाधिकारी मुंबईत दाखल होतात. मात्र, यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त भागांतील शिवसैनिकांनी मुंबईत येण्याऐवजी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दारी मदतीचे तोरण लावावे, तर मुंबई आणि परिसरातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार आहे.
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचे आवाहन केल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या मान्यवरांनी शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा केवळ राजकीय भाषणांपुरता मर्यादित न राहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्याच्या उपक्रमांवर केंद्रित राहणार आहे.