पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गडावर अन्नधान्य पुरवणारा वंजारी समाज आहे. दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या; पण त्या आधारावर संपूर्ण समाजाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. मी चुकलो तर मला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ठाण्यात व्यक्त केली.
ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. २७) पार पडले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय मुंडे आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे येणार होत्या; पण भाऊ चालला आहे, माझ्या वतीने शुभेच्छा दे, असा त्यांचा निरोप सुरुवातीलाच मुंडे यांनी दिला. त्यानंतर त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनातील संघर्षाला उजाळा दिला.
गोपीनाथ मुंडे हे द्रष्टे होते. त्यांनी त्या वेळी आपल्याला बाजूला केले नसते तर आज मंत्रिमंडळात बहीण-भाऊ एकत्र बसले नसते, असे धनंजय मुंडे म्हणाले. या वेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरण आणि हत्याकांडानंतर होणाऱ्या टीकेलाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की राजकीय व्यक्ती म्हणून सर्व टीका स्वीकारल्या आहेत. मी चुकलो तर मला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा. त्याचा जातीपर्यंत संबंध लावू नये. दोनशे दिवसांत आपल्यासह संपूर्ण जिल्हा बदनाम का करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दोन वेळा वाचलो
दोनशे दिवसांत दोन वेळा मरता-मरता वाचलो, ही गोष्ट केवळ डॉ. लहाने यांना माहीत आहे, असेही मुंडे या वेळी म्हणाले. मी ज्या समाजात जन्माला आलो त्याचा मला निश्चित अभिमान आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरे काय हवे. मंत्रिपदाला काय चाटायचे आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.