मुलीसाठी वडिलांनी घर विकलं, आज तिच्या जाण्याने मन सुन्न झालं

महाराष्ट्र

पिंकी माळींच्या कुटुंबाला भेटल्यानंतर रोहित पवार भावुक

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक आणि क्रू-मेंबर पिंकी माळी यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मृत क्रू-मेंबर पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या भेटीनंतर रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “एका टॅक्सी चालकाने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी स्वतःची खोली विकली, तिला मोठं केलं आणि ती मुलगी घराची जबाबदारी समर्थपणे पेलू लागली असतानाच काळाने तिच्यावर झडप घातली. हे सगळं पाहून मन सुन्न झालं आहे.”

पिंकी माळी यांचे वडील मुंबईत टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मुलीला उच्च शिक्षण मिळावं आणि तिचं करिअर घडावं यासाठी त्यांनी आपले राहते घरही विकले होते. पिंकीने अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम करून आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले. घराची आर्थिक परिस्थिती सावरत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली, असेही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, पिंकी माळी यांचा भाऊ सध्या शिक्षण घेत असून त्याच्या भवितव्याबाबत रोहित पवार यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. “कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता त्याच्या नोकरीसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी परिवार या कुटुंबाच्या सोबत ठामपणे उभा आहे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले, “सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली याचा आनंद आहे. मात्र सध्या संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्र दुःखात आहे. अशा वेळी राजकारणापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. दादांच्या जागी आम्ही आजही सुनेत्रा वहिनींनाच पाहतो.”

तसेच राजकीय विलीनीकरण आणि वादांवर सध्या बोलणे टाळत रोहित पवार यांनी सांगितले की, “सध्या केवळ सांत्वन आणि मदतीला प्राधान्य आहे. राजकीय विषयांवर मी १३ दिवसांनंतरच बोलेन.”