शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी आणि मतभेद दूर करून एकसंघ व्हा

महाराष्ट्र

धाराशिव: शिवसेना हे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये काही कुरबुरी असतील काही मतभेद असतील ते दूर करा आणि एकसंघ व्हा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथे बोलताना केले. धाराशिवमधील भव्य नागरी सत्कार सोहळ्यातून कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

“शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधून टाकली होती… ती वाचवण्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला!” असा जोरदार टोला लगावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला. “ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, कोणाच्या दावणीला बांधलेली नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचे ठाम समर्थन केले.

“मी आजही कार्यकर्ता आहे… आणि जिंकणे हा आमचा हक्क आहे!” या दमदार आणि भावनिक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले म्हणणे मांडले. विनम्रतेचा सुर, आक्रमकतेची धार आणि विकासाचा ठाम निर्धार या त्रिसूत्री संदेशातून शिंदे यांनी स्वतःची “कार्यकर्ता नेता” ही प्रतिमा अधिक मजबूत करत, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा शब्द दिला.

सत्कार स्वीकारताना शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. त्यामुळे असे सत्कार स्वीकारताना अवघडल्यासारखे वाटते.” त्यांनी स्पष्ट केले की हा सन्मान वैयक्तिक नसून “माझ्यासोबत काम करणाऱ्या शेकडो शिवसैनिकांच्या घामाचा” आहे.

भावनिक होत त्यांनी सांगितले, “तुम्ही गळ्यात घातलेल्या हारातील फुलांना तुमच्या प्रेमाचा, परिश्रमाचा, निष्ठेचा, त्यागाचा आणि बलिदानाचा गंध आहे. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आणि भावांचा आहे.” कार्यकर्त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “माझे शिवसैनिक हेच खरे सिकंदर… तुम्हीच खरे बाजीगर आहात!”

आपल्या भाषणात त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, शिवसेनेचे यश हे त्यांच्या शिकवणीचे फलित आहे. “मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा हा विजय आहे,” असे ते म्हणाले.

2022 मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “आपण मोठं धाडस केलं, उठाव केला… पण त्या वेळी सावली नव्हती. सामान्य जनतेने डोक्यावर सावली धरली आणि शिवसैनिक भावासारखे पाठीशी उभे राहिले.”

विरोधकांवर हल्लाबोल करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “असली कोण आणि नकली कोण हे वारंवार सिद्ध झालंय. शिवसेना हरवणे नामुमकिन आहे.” तसेच, “डर के भाग जाना हमारी फितरत नहीं… जिंकणे आमचा हक्क आहे!” असा इशाराही त्यांनी दिला. “विरोधकांचा टांगा पलटी झाला आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

“आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही. वर्षभर नेटफ्लिक्स पाहून निवडणुकीत राजकारण करणारे नाही,” असा टोला लगावत त्यांनी प्रत्यक्ष कामावर भर दिला.

धाराशिवसाठी मोठ्या विकासकामांची घोषणा करत त्यांनी सांगितले की तुळजाभवानी मंदिराचा अयोध्या राम मंदिराच्या धर्तीवर भव्य विकास केला जाणार असून यासाठी सुमारे 1865 कोटी मंजूर आहेत. 8 प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि 8 कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. “बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना” अंतर्गत 250 हून अधिक गावांना लाभ झाला असून 700 किमी काम पूर्ण झाले आहे.

कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी 11,723 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले आहे.

“हा भाग तहानलेला आहे… इथली शेती कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले.

कार्यकर्त्यांना संदेश देताना ते म्हणाले, “20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हा आपला मंत्र आहे. निवडणुका झाल्या… आता लोकांचे प्रश्न सोडवा.”

स्वतःवर जबाबदारी घेत त्यांनी ठाम शब्दांत सांगितले, “मी चुकलो तर मला सोडू नका… पण मी शब्द देतो, चुकणार नाही, थांबणार नाही आणि जनसेवेचा वसा कधीही सोडणार नाही.”

“आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही… पण सामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना झटून काम करण्याचे आवाहन केले.

मतदार संघाची पूर्ण रचना होऊन लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ वाढणार आहेत. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बारकाईने लक्ष ठेवावे असे आव्हान त्यांनी केले.

दरम्यान, धाराशिवमधील हा नागरी सत्कार भावनिक, आक्रमक आणि विकासाभिमुख संदेश देणारा ठरला. कार्यकर्ता नेता, जनतेशी मजबूत नातं आणि जिंकण्याची मानसिकता या तिन्ही गोष्टींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा अधिक बळकट झाल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार न्यानराज चौगुले, माजी आमदार संगीता ठोंबरे, शशिकांत खेडकर, जिल्हाप्रमुख अजित पिंगळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत