मीट ग्राइंडरमध्ये सापडलेले ते 32 तुकडे कसले! मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई

महाराष्ट्र

मुंबई: मीट ग्राइंडरच्या आत लपवून सौदी अरेबियाहून भारतात आणण्यात आलेल्या सोन्याच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) उघडकीस आणला आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर ही कारवाई करण्यात आली असून तब्बल 2.89 कोटी रुपये किमतीचे 1.815 किलो सोनं जप्त करण्यात आले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सौदी अरेबियाहून आलेल्या एका संशयित कुरिअर शिपमेंटची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान त्या शिपमेंटमध्ये असलेल्या मीट ग्राइंडरची झडती घेतली असता अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला.

मीट ग्राइंडर उघडल्यानंतर त्यामधून सोन्याचे तब्बल 32 तुकडे सापडले. हे सोने अत्यंत कुशलतेने मशीनच्या आत लपवण्यात आले होते, जेणेकरून तपास यंत्रणांच्या नजरेत येऊ नये.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कस्टम कायद्यानुसार हे सोने जप्त करण्यात आले असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोघे रियाधहून आलेल्या या शिपमेंटला गोळा करण्यासाठी आणि त्याची एस्कॉर्टिंग करण्यासाठी भारतात आले होते.

केवायसी कागदपत्रांचा गैरवापर

सोन्याच्या तस्करीसाठी आरोपींनी विशेष योजना आखली होती. कुरिअर टर्मिनलमधून सोने बाहेर काढण्यासाठी त्यांनी एका विशिष्ट फर्मकडून केवायसी कागदपत्रे तयार करून घेतली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

डीआरआयने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून, या तस्करीमागे कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पुढील चौकशीत आणखी अटकेची शक्यता नाकारता येत नाही.