केजरीवालांनंतर आणखी एक मुख्यमंत्री तुरूंगात जाणार? 

महाराष्ट्र

मुंबई: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पदावर असताना ईडीने कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ते काही महिने तुरुंगात होते. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मागीलवर्षी पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच तुरूंगात जावे लागले होते. आता काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार प्रकरणात आणखी एक मुख्यमंत्री लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे विधान केले आहे.

राहुल गांधी हे बुधवारी आसामच्या दौऱ्यावर होते. चायगांव येथे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे लवकरच जेलमध्ये जातील. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही वाचवू शकणार नाहीत, असे राहुल यांनी म्हटले आहे.

एकीकडे आरएसएसची द्वेष, विभागणी आणि लढविण्याची विचारधारा आणि दुसरीकडे काँग्रेसची द्वेष संपविण्याची विचारधारा आहे. आज आसाममध्ये जे होत आहे, तेच संपूर्ण देशातही सुरू आहे. येथील मुख्यमंत्री स्वत:ला राजा समजत आहेत. पण त्यांच्या आवाजामागे, डोळ्यांत भीती लपली आहे. त्यांच्या मनात भीती आहे. कारण त्यांना माहित आहे की, काँग्रेसचे बब्बर शेर त्यांना जेलमध्ये टाकतील. भ्रष्टाचाराचा हिशोब आसामच्या जनतेला द्यावा लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

मी जे बोलतो, तसे होते, असे सांगत राहुल म्हणाले, मी कोरोना, नोटबंदी, जीएसटीवेळी जे बोललो, त्याचे परिणाम तुम्ही पाहिले. मी आज बोलतोय की, काही कालावधीनंतर मीडियावाले तुमच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाताना दाखवतील. त्यांना नरेंद्र मोदी, अमित शाह हेही वाचवू शकणार नाहीत. हे काम काँग्रेस नव्हे तर राज्यातील युवक, शेतकरी, मजूर करून दाखवतील. हा व्यक्ती भ्रष्ट आहे, हे त्यांना माहिती आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.

राहुल गांधी यांच्या टीकेला मुख्यमंत्री सरमा यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आसाममध्ये येतात आणि मला जेलमध्ये टाकण्याबाबत बोलतात. पण ते विसरत आहेत की, ते स्वत: जामिनावर बाहेर आहेत, असे सरमा यांनी सोशल मीडियातून म्हणत राहुल यांच्या टीकेची खिल्ली उडवली आहे.