मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.
सपकाळ म्हणाले की, डॉ. सप्तर्षी हे गांधी विचारांचे खरे पाईक होते. त्यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि दलित, मागास व वंचितांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. विविध सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी अनेकदा तुरुंगवासही भोगला.
‘युवक क्रांती दल’च्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून अनेक पिढ्यांना वैचारिक दिशा मिळाली. सत्ता नव्हे, तर समाजपरिवर्तन हा त्यांचा जीवनधर्म होता, असेही सपकाळ यांनी नमूद केले.
देशात संविधान आणि लोकशाही मूल्यांवर संकट असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. सप्तर्षी यांच्यासारख्या परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्वाचे निधन ही मोठी हानी असल्याचे सांगत, गांधी स्मारक निधीचे विश्वस्त म्हणून त्यांनी गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी म्हटले.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सप्तर्षी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.