crime

शिरुरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, मलठण परिसरात एका रात्रीत फोडली पाच घरे

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई, मलठण येथे अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत पाच बंद घरे फोडुन दहशत निर्माण केली आहे. तर फाकटे, सविंदणे येथे चोरीचा प्रयत्न फसला आहे. या परीसरात ड्रोनने धुमाकुळ घातला असुन नागरीक भितीच्या छायेखाली जगत आहे.

 

या परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असुन, अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या विद्युत रोहित्र चोऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही विद्युत रोहित्र चोरट्यांना गजाआड करुनही अद्याप रोहित्र चोरीचा सपाटा सुरूच आहे. त्यातच चोरट्यांनी आता मोर्चा बंद घरांकडे वळवला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

कवठे येमाई (ता.शिरूर) येथे शनिवारी (ता.२९) रात्रीच्या सुमारास हरिदास भट, अयुब मोमीन, रियाज पठाण या तिघांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. मात्र, यामध्ये मुद्देमाल हाती न लागल्याने चोरट्यांनी मोर्चा जवळच असलेल्या मलठणच्या दिशेने वळवला. वाव्हळवस्ती (मलठण) येथील गणेश दामोदर वाव्हळ यांच्या घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

 

तसेच शिंदेवाडी (मलठण) येथील भाऊसाहेब जिजाबा शिंदे (वय ५०) यांच्या बंद असलेल्या घराचा अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून घरातुन दिड तोळे सोन्याचे गंठण व १० हजार रोख रक्कम असा ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. शिंदे यांचा मेंढीपालन व्यवसाय असल्याने, त्यांचे घर अनेकदा बंद असते. त्यांना रविवारी (ता ३०) रोजी सकाळी शेजाऱ्यांनी चोरी झाल्याची माहिती दिली.

 

त्यानंतर शिंदे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबेना, शेतकरी हतबल ;पोलिसांपुढे मोठे आव्हान