- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात
रत्नागिरी: ईडीच्या कारवाईतून मुक्तता व्हावी म्हणून भाजपसोबत गेलो असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप जोरजबरदस्ती करतं, दादागिरी करतं अशी घणाघाती टीका त्यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप कशाप्रकारे जोरजबरदस्ती करतं, दादागिरी करतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी आहे. जोरजबरदस्ती करून भाजपने स्वतःचे सरकारला बसवले खरे पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या चिंधड्या केल्या.
मी मागेच एकदा म्हणालो होतो की जे लोक फुटून तिकडे गेले होते, त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना फार आधीपासूनच ब्लॅकमेल केलं जायचं. वरील विधानाने त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे असेही ते म्हणाले
ही विधानसभा निवडणूक भाजपसारख्या असंवेदनशील आणि संधीसाधू पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची नामी संधी आहे. भाजपची दादागिरी संपवण्याची, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वाचवण्याची, महाराष्ट्र धर्म रक्षणाची हीच ती वेळ असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.