एनडीस आर्ट वर्ल्ड’चे संपूर्ण दायित्व प्रदान; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दायत्वपूर्ती सोहळा संपन्न

महाराष्ट्र

१०० दिवस कार्यक्रमातर्गत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

मुंबई: दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ (ND Studio) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला असून ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड’चे संपूर्ण दायित्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधानभवन येथे दायित्वपूर्ती सोहळा संपन्न झाला.

यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार , उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (वित्त व नियोजन ) आशिष जैस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आदी उपस्थित होते.

१४ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण यांनी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक दिवंगत श्री नितीन चंद्रकांत देसाई यांचा ND’s art world परिचालनासाठी महाराष्ट्र शासना अंतर्गत फिल्मसिटी मुंबईकडे सोपवण्यात यावा असा निर्णय दिला. याकरिता नियोजित दायित्व पूर्तता कालावधी दिनांक १४ मे २०२५ पर्यंत असूनही १०० दिवसाच्या वचनपूर्तीच्या अनुषगाने जलदगतीने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे परिचालन व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महामंडळ नियोजन करत आहे.

‘एनडी’स आर्ट वर्ल्डचा ४७ एकरचा विस्तीर्ण परिसर आहे. या परिसरात चित्रीकरणे, समारंभ, पर्यटन, फोटोशूट, मेळावे, प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी करता येतील. अनेक पौराणिक, ऐतिहासिक, मराठी, हिंदी चित्रपटांचे, मालिकांचे, जाहिरातींचे शूटिंग याठिकाणी करता येऊ शकते. विविध वास्तूंच्या प्रतिकृती आणि भव्य दिव्य सेट याठिकाणी आहेत.